तुरळक भागांत अतिवृष्टीचा इशारा

पुणे : राज्यात पावसाला पोषक वातावारण निर्माण झाल्याने ५ किंवा ६ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई-ठाण्यासह कोकण विभागात अनेक ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिाम-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी आणि विदर्भातही काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले आहे.  पश्चिाम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस होत आहे. मात्र, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन बहुतांश भागात पावसाची हजेरी असणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण विभागात ५ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी भागांत काही ठिकाणी ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुसळधारांची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही या काळात अनेक ठिकाणी मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत काही ठिकाणी ७ सप्टेंबरला अतिवृष्टी होण्याचा इशाराही आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि पश्चिाम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधारांची शक्यता आहे. घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आदी जिल्ह्यांत ६ आणि ७ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आदी जिल्ह्यांत ६, ७ सप्टेंबरला पावसाचा जोर राहणार आहे.