possible to measure the flexibility and stiffness of proteins in the human body pune news ysh 95 | Loksatta

X

मानवी शरीरातील प्रथिनांची लवचिकता, काठिण्य मोजणे शक्य

मानवी शरीरात सूक्ष्म यंत्राप्रमाणे कार्य करणाऱ्या प्रथिनांचे काठिण्य किंवा लवचिकता मोजणे आता शक्य झाले आहे.

मानवी शरीरातील प्रथिनांची लवचिकता, काठिण्य मोजणे शक्य

आयसर पुणेतील डॉ. शिवप्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाची कामगिरी

पुणे : मानवी शरीरात सूक्ष्म यंत्राप्रमाणे कार्य करणाऱ्या प्रथिनांचे काठिण्य किंवा लवचिकता मोजणे आता शक्य झाले आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) डॉ. शिवप्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या गटाने या बाबतचे संशोधन करून प्रथिनांची लवचिकता किंवा काठिण्य मोजण्यासाठीचे उपकरण आणि पद्धत विकसित केली आहे.

डॉ. शिवप्रसाद पाटील यांच्यासह सूर्य प्रताप देवपा, शत्रुघ्न सिंह राजपूत, आदर्श कुमार यांचा सहभाग आहे. ‘डायरेक्ट अँड सायमल्टेनियस मेजरमेंट ऑफ द स्टिफनेस अँड इंटर्नल फ्रिक्शन ऑफ द सिंगल फोल्डेड प्रोटिन’ हे संशोधन ‘जर्नल ऑफ फिजिकल केमिस्ट्री लेटर्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. मानवी शरीरामध्ये असलेल्या प्रथिनांचे अतिशय सूक्ष्मपणे काम सुरू असते. मात्र त्यांची लवचिकता किंवा काठिण्य कसे मोजायचे हा प्रश्न शास्त्रज्ञांपुढे अनेक वर्षे आहे. त्या दृष्टीने जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र डॉ. शिवप्रसाद पाटील यांच्या संशोधन गटाने अ‍ॅटोमिक फोर्स मायक्रोस्कोप या उपकरणाची संवेदनशीलता एक हजार पटीने वाढवून प्रथिनांची लवचिकता किंवा काठिण्य मोजण्यात यश मिळवले.

प्रथिन हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मधुमेह, हृदयविकारासह अनेक आजार जनुकीय असतात. त्यामुळे जनुकांमध्ये काय बदल घडला या अनुषंगाने आजारांमध्ये अंदाज बांधले जातात. त्यानंतर निरोगी माणूस आणि आजारी माणूस यांच्या जनुकांची तुलना करून काहीएक निष्कर्ष निघतात. जनुके शेवटी प्रथिने बनवण्याची संपूर्ण माहिती बाळगून असतात. त्यामध्ये झालेल्या चुकांची परिणीती प्रथिनांच्या रचनेत आणि कामात गडबड घडवून आणण्यात होते. त्यामुळे प्रथिनांमध्ये झालेले बदल टिपणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रथिनांचे काठिण्य किंवा लवचिकता कळणे महत्त्वाचे होते. आतापर्यंत  प्रथिनाचा एक रेणू घेऊन तो दाबून पाहणे हे कठीण काम होते. मात्र आता या संशोधनामुळे प्रथिनांचे काठिण्य, लवचिकता, प्रथिनांतील बदल समजू शकणार आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

शरीरशास्त्र, वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त

प्रथिनांमध्ये काय बदल झाला, त्यांच्या आकारात बदल झाला, त्यांचे काठिण्य किंवा लवचिकता कमी-जास्त झाली का याचा अभ्यास आता शक्य झाला आहे. त्यामुळे येत्या काळात शरीरशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात हे संशोधन उपयुक्त ठरू शकणार आहे. त्या दृष्टीने अधिक संशोधन सुरू असल्याचेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
राज्यात पाच हजार बायोगॅस संयंत्रे उभारणार; केंद्राच्या योजनेचा कोल्हापूर, पुणे, नगरला सर्वाधिक लाभ