महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पावसाळापूर्व तयारीची कामे शहरात कोणत्याही भागात सुरू नाहीत. एकूणच कामांच्या बाबतीतील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि या परिस्थितीला आयुक्तच जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. स्थायी समिती आणि मुख्य सभेत आयुक्त अनुपस्थित राहतात म्हणूनच ही परिस्थिती आहे, असेही मनसेचे म्हणणे आहे.
आयुक्तांच्या अनुपस्थितीबद्दलची माहिती मनसेचे महापालिकेतील गटनेता राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने नेमकी काय व्यवस्था केली आहे, खड्डे कधी बुजवले जाणार आहेत, रस्ते दुरुस्ती केव्हा पूर्ण होणार आहे, गटाराची सफाई केव्हा होणार आहे आदी मुद्यांबाबत आम्हाला खुलासा हवा आहे. मात्र कामे शहरात सुरू असल्याचे दिसत नाही, असे वागसकर म्हणाले. शहरात कामे का होत नाहीत याबाबत अभ्यास केल्यानंतर आयुक्त स्वत:च स्थायी समिती आणि मुख्य सभेत अनुपस्थित असतात आणि त्यामुळे या सभांमधील कामकाजाची त्यांना माहिती होत नाही असे लक्षात आले, असेही वागसकर यांनी सांगितले.
महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार २५ ऑगस्ट १४ पासून ३१ मार्च १५ पर्यंत स्थायी समितीच्या ५९ बैठका झाल्या. त्यातील २४ बैठकांना आयुक्त उपस्थित होते. तसेच २२ ऑगस्ट १४ पासून एप्रिल १५ पर्यंत ९९ मुख्य सभा झाल्या. त्यातील ६३ सभांना आयुक्त उपस्थित होते. आयुक्तांच्या या अनुपस्थितीवरून हेच लक्षात येते की ते स्वत: महत्त्वाच्या बैठका व सभांना नसल्यामुळे खातेप्रमुख तसेच अन्य संबंधित अधिकारी कामांकडे दुर्लक्ष करतात, असेही वागसकर यांनी सांगितले.