पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, खड्डेच खड्डे पडले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर तब्बल २००३ खड्डे आढळून आले हाेते. त्यांपैकी १५८० बुजविले असून, केवळ ४२३ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा जूनअखेर पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली, आकुर्डी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २००३ खड्डे आढळले हाेते. त्यांपैकी १६३९ खड्डे १३ जुलैपर्यंत आढळून आले हाेते. त्यानंतर २२ जुलैअखेर ३६४ खड्डे आढळून आले आहेत. यांपैकी डांबर आणि काेल्ड मिक्सने १०११, खडीने ३५६, पेव्हिंग ब्लाॅकने ६६, सिमेंट कॉंक्रीटने १४७ असे १५८० खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. शहरातील केवळ ४२३ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येतात.

हेही वाचा – पुणे : पुराच्या दूषित पाण्यामुळे आता धोका! महापालिकेच्या आरोग्य विभागाचा इशारा

वाहनचालकांची कसरत

खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. वाहन खड्ड्यात आदळून चालकाला तसेच वाहनाला दणका बसत आहे. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी वाहतुकीला संथ गती येत आहे.

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्यात अपयशी ठरले आहे. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अमित गावडे यांनी केली.

हेही वाचा – पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेने स्वयंपाकघरातील चाकूने भोसकून घेतले, महिलेचा मृत्यू; पती अटकेत

पावसामुळे डांबरीकरण करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम, खडी आणि सिमेंट-कॉंक्रीटने बुजविले जातात. पावसाळा संपल्यानंतर सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

दर वर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात आणि स्वत: नामानिराळे राहतात. रस्ते तयार करताना त्यावर खड्डे पडणारच नाहीत अशा प्रकारे दर्जेदार का बांधले जात नाहीत? रस्त्याचा आराखडा तयार करणाऱ्या अभियंत्यापासून तो बनविणाऱ्या ठेकेदारांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल केले तरच याला आळा बसेल, असे वाहनचालक नितीन गावडे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on roads in pimpri chinchwad how many potholes in the city what is the claim of the municipal corporation pune print news ggy 03 ssb
Show comments