पुणे : महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात बिघाड झाल्याने भोसरी आणि पिंपरी परिसरातील वीज पुरवठा सोमवारी विस्कळीत झाला. पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत असून, वीज यंत्रणेच्या दुरूस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
महापारेषणच्या भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० मेगाव्हॅट क्षमतेच्या रोहित्रामध्ये सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला. भोसरी गावठाण, टी ब्लॉक, जनरल ब्लॉक, एस ब्लॉक, शांतीनगर, धावडे वस्ती, गुळवे वस्ती, आळंदी रस्ता परिसर, चक्रपाणी वसाहत या परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. परिसरातील सुमारे ९५ उच्चदाब आणि ३७ हजार लघुदाब ग्राहकांना विस्कळीत वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.
महापारेषण आणि महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र, काही कारणांमुळे हा बिघाड दुरुस्त झाला नाही. त्यामुळे या अतिउच्चदाब रोहित्रावर अवलंबून असलेला ८० मेगाव्हॅट क्षमतेचा वीजभार पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून सुरळीत करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणच्या भोसरी व पिंपरी विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या वीज वाहिनीवर भार टाकावा लागणार असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करताना त्यात अडचणी येऊ शकतात. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे स्पष्टीकरणही महावितरणकडून देण्यात आले.
दरम्यान, भोसरी आणि पिंपरी परिसरात उद्योग व्यवसायांचे मोठे जाळे आहे. विस्कळीत वीज पुरवठ्याचा परिणाम या उद्योगांवर होत असून, महावितरण आणि महापारेषणकडून अशा प्रकारचे बिघाड होऊ नयेत म्हणून विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तात्पुरते उपाय न करता, कायम स्वरुपी तोडगा काढण्याची मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे.
महापारेषणचे म्हणणे काय ?
‘भोसरी उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत परिसरातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून सुरळीत करण्यात आला,’ असे महापारेषणचे अधीक्षक अभियंता विठ्ठल भुजबळ यांनी सांगितले.
वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
अचानक उद्भवलेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे आणि विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.

