पुणे : वीज यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हिंजवडी परिसरातील ‘इन्फोसिस’ आणि ‘नेक्स्ट्रा’ या कंपन्यांसह ९१ उच्चदाब आणि सुमारे १२ हजार घरगुती ग्राहकांना रविवारी विस्कळीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले.

महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (६ जुलै) सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत वीजपुरवठा बंद केला होता. मात्र, देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू करताना ‘इन्फोसिस ते पेगासस’ या अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत दुपारी सव्वादोनच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या हिंजवडी एमआयडीसी आणि आयटी पार्क परिसरातील ९१ उच्चदाब व सुमारे १२ हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.