पुणे : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरणच्या पर्वती विभागातील वीजपुरवठा आज (गुरुवार, ५ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पर्वती विभागांतर्गत येणाऱ्या नवी पेठ, तक्षशीला, तरुण भारत आणि विठ्ठलवाडी येथील फिडरचा वीजपुरवठा कंपनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज बंद राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
पत्रकार भवन, फाटकबाग सोसायटी, सेनादत्त पोलीस चौकी, श्री सईनगर, लोकमान्यनगर, राजेंद्रनगर, गांजवे चौक, न्यू इंग्लिश स्कूल, रामबाग कॉलनी, सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पेरूगेट, वाडिया हॉस्पिटल, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, फरासखाना, जोगेश्वरी, लक्ष्मी रस्ता, श्रीनाथ चित्रपटगृह (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता), बाजीराव रस्ता आणि लगतचा परिसर, टिळक रस्ता, टेलिफोन भवन, चिमणबाग, स. प. महाविद्यालय, महात्मा फुले मंडई, हत्ती गणपती, भरतनाट्य मंदिर, भारती विद्यापीठ भवन, वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पूना हॉस्पिटल, जेएसपीएम महाविद्यालय, झिल महाविद्यालय, नऱ्हेगाव, भूमकर चौक, अभिनव महाविद्यालय, स्वामीनारायण मंदिर, पारी कंपनी चौक, अष्टविनायक इंडस्ट्रियल, धायरी परिसर, शुक्रवार पेठ, भाजी मंडई, बदामी हौद, कला हौद चौक, प्रेस्टिज पॉईंट, चिंचेची तालीम, सेवा मित्र मंडळ चौक, मधुकर हॉस्पिटल जवळील भाग, धनलक्ष्मी महालक्ष्मी सोसायटी, एकता नगरी, आनंदनगर, संतोष हॉल चौक, जनता वसाहत गल्ली क्रमांक ५० ते गल्ली क्रमांक १०९, १२२ चुना भट्टी, शंकर मंदिरचा परिसर, राम मंदिरचा परिसर, वाघजाई मंदिर या परिसरातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.
अधिकारी काय म्हणतात ?
देखभाल दुरुस्तीसाठी आज वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, लवकरात लवकर तो पूर्ववत करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे महावितरण पर्वती विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश फलके यांनी सांगितले.
वीजतज्ज्ञ काय म्हणतात ?
मुंबईसारख्या शहरात देखभाल दुरुस्तीसाठी एकही दिवस वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत नाही, तीन वेगवेगळ्या कंपन्या शहरात वीज पुरवठा करतात. असे असूनही मुंबईत एकही दिवस वीज खंडित होत नाही. मोठा अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातच ठराविक कालावधीसाठी मुंबईतही वीज पुरवठा विस्कळीत होते. पुण्यात मात्र, देखभाल दुरुस्ती करूनही नागरिकांना विस्कळीत वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो. उद्योग, व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसत असल्याचे निरीक्षण वीजतज्ज्ञ नोंदवतात.

