‘प्रभात पुरस्कारा’साठी ‘७२ मैल- एक प्रवास’, ‘दुनियादारी’, ‘रेगे’, ‘अस्तु’, ‘फॅन्ड्री’, ‘यलो’ आणि ‘आजचा दिवस माझा’ या सात चित्रपटांची निवड झाली आहे. प्रभात चित्रपटगृह येथे शुक्रवारपासून (२ मे) प्रभात पुरस्कार चित्रपट महोत्सव होणार आहे. प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून १ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
मराठी चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त गेल्या वर्षीपासून ‘प्रभात’ने मराठी चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणाऱ्या ‘प्रभात पुरस्कारां’ची घोषणा केली. ‘प्रभात’ची नाममुद्रा आणि निवड प्रक्रियेतील वेगळेपण यामुळे प्रभात पुरस्कारांनी एक मानाचे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी २०१३ मध्ये सेन्सॉर संमत झालेल्या ५९ मराठी चित्रपटांनी प्रवेशिका दाखल केल्या होत्या. निवड समिती आणि परीक्षक मंडळ असा दुहेरी आणि काटेकोर चाळणीनंतर यंदाच्या संभाव्य विजेत्यांची नावे आणि या वर्षांतील सात चित्रपटांची अंतिम यादी करण्यात आली आहे. २ मे ते ८ मे या कालावधीत प्रभात चित्रपटगृह येथे दररोज सायंकाळी सहा वाजता हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. निवडक प्रेक्षकांना या महोत्सवास विनामूल्य प्रवेशाशिवाय विविध पुरस्कारांसाठी मतदान करण्याची संधीही प्रभाततर्फे देण्यात आली आहे, अशी माहिती विवेक दामले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. इच्छुकांनी आपली नावे प्रभात चित्रपटगृह येथे शनिवार (२६ एप्रिल) ते बुधवार (३० एप्रिल) या कालावधीत सायंकाळी पाच ते सात या वेळात नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.