देशाला चारित्र्यसंपन्न प्रशासकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे. सद्यस्थितीत अधिकारी त्यांचे अधिकार व शक्तीच्याच मागे धावताना दिसतात. जनहितापेक्षा अन्य गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटतात, अशी खंत राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी निगडीत बोलताना व्यक्त केली. निगडीतील ज्ञानप्रबोधनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाने आयोजित केलेल्या ‘प्रबोध रत्न’ पुरस्काराच्या वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट होते. यावेळी केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, मंडळाचे प्रमुख अजय लोखंडे उपस्थित होते. प्रशांत कोंडे, अतुल इनामदार, दीपक हिवरकर यांना ‘प्रबोध रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. सत्यनारायण म्हणाल्या, लहान वयातच विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाऊन राष्ट्रहित जपण्याचे बाळकडू दिले पाहिजे. त्यातून राष्ट्रसेवाच होणार आहे. डॉ. अवचट म्हणाले, विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता त्यांना हवे ते शिकू दिले पाहिजे. आपण स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. काहीतरी वाईट होईल, या भीतीने जगापासून तोडून घेतले आहे. अभ्यंकर म्हणाले, निधी अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये. अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांला काढून न टाकता त्याला सर्वप्रकारे मदत केली पाहिजे. प्रास्ताविक प्रशांत आहेर यांनी केले. मधुरा लुंकड, पल्लवी हुलावळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रणिता वालावलकर यांनी आभार मानले.