पुणे : प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने पुण्यातील प्राज मॅट्रिक्स येथे अत्याधुनिक प्रिसिजन फरमेंटेशन प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. पुढील पिढीतील जैवतंत्रज्ञानाला चालना देणे आणि उच्च कार्यक्षमता व कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या जैव-उत्पादन क्षेत्राकडे होणारे संक्रमण वेगवान करणे हा प्रयोगशाळेच्या स्थापनेमागील उद्देश आहे.
प्राज मॅट्रिक्सच्या १८ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. प्राज आणि प्राज हायप्युरिटी सिस्टीम्स यांच्याकडून औषध आणि जैवतंत्रज्ञान उद्योगांना प्रीसिजन फरमेंटेशन यंत्रे आणि अतिशुद्ध जलप्रणालीचा पुरवठा केला जातो. आता या कंपन्यांकडून औषधे, अन्न, सौंदर्यप्रसाधने, जैवइंधन आणि पेये या क्षेत्रांना प्रीसिजन फरमेंटेशन उपाययोजनांचा पुरवठा करणे शक्य होईल. पुढच्या पिढीतील जैव-उत्पादन क्षेत्रातील क्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने प्राजने ही सुविधा विकसित केली आहे.
याबाबत केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश एस. गोखले यांच्या उपस्थितीत प्राजने ‘बायोटेक्नोलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल’ (बीआरआयसी) आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस) या संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे. सूक्ष्मजीव संशोधन, जनुकीय विज्ञान आणि पेशी संवर्धन भांडार असलेल्या ‘बीआरआयसी’ आणि ‘एनसीसीएस’ यांच्याशी या निमित्ताने प्राजने भागीदारी केली आहे. केंद्र सरकारच्या ‘बायो ३’ म्हणजेच अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान या उपक्रमाशी सुसंगत असे हे पाऊल आहे.
संशोधनाला गती
प्राज आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे सहकार्य संशोधनापासून ते जैव-उत्पादनापर्यंतच्या संक्रमणाला गती देणार आहे. याबरोबरच प्रगत जैव-प्रक्रिया क्षमता विकसित करणे, उपयुक्त रेणू आणि सूक्ष्मजीव प्रजातींचा शोध घेणे, संशोधकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षण संस्था व उद्योग क्षेत्र यांच्यात संयुक्त संशोधन, प्रायोजकत्व आणि दीर्घकालीन सहकार्य सुलभ करणे यावर भर देण्यात येईल.
भारताच्या जैव-अर्थव्यवस्थेची वाढ ही शिक्षण संस्था व उद्योग क्षेत्रातील भक्कम सहकार्य आणि कुशल वैज्ञानिक मनुष्यबळावर आधारित असेल. अशा प्रकारचे उपक्रम हे विभागाच्या संशोधनाला चालना देणे व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात क्षमता बांधणी करणे या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. नाविन्यपूर्णतेला गती देण्यात आणि भारताची जैव-अर्थव्यवस्था बळकट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. – डॉ. राजेश एस. गोखले, केंद्रीय सचिव, जैवतंत्रज्ञान विभाग.
