पुणे : ‘मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा आणि आंदोलनाचे केंद्र बदलले असून, पूर्वी मुंबई आणि ठाण्याभोवती असलेले आंदोलनाचे केंद्र आता दिल्लीकडे सरकले आहे. गरीब मराठ्यांच्या प्रश्नापेक्षा सत्तेच्या राजकारणातील पटावरचा खेळ या आंदोलनात अधिक असल्याचे दिसत आहे,’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. बेरोजगार आणि त्रस्त तरुण मराठा वर्गाने कोणाच्या नादी लागू नये, असे आवाहनही त्यांनी केले. ‘जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेतील मराठा नेत्यांनी ही मागणी कधीच मान्य होणार नाही, हे सांगण्याची हिंमत दाखवावी.”
आंबेडकर म्हणाले, “मागण्याच अशा करायच्या की ज्या मान्यच होणार नाहीत आणि त्यातून डोके भडकवण्याचे काम सुरू ठेवायचे, या गोष्टीला आता आळा बसला पाहिजे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी आवश्यक माहिती आणि आकडेवारी सरकारने न्यायालयासमोर ठेवावी. ती घटनेच्या चौकटीत आहे की नाही, याची तपासणी करून न्यायालय निर्णय देईल. मात्र, कोणत्यातरी प्रवर्गात जाऊन आरक्षण मागताना त्या प्रवर्गाचे निकष पूर्ण करावे लागतात. ओबीसी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत असले तरी, लढणारा ओबीसी वर्ग आणि ओढून-ताणून ओबीसींचे नेतृत्व करणारा वर्ग वेगळा आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनीच या प्रश्नावर अधिक बोलणे योग्य ठरेल.’
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे अमेरिकेतील भाषण ऐकले असेल. आपण सर्वांना सोबत घेऊन चालतो, असे जगाला सांगायचे आणि भारतात आल्यानंतर एकमेकांना दूर लोटायचे, अशी दुटप्पी भूमिका चळवळीत आणि राजकारणात असू नये,’ अशी टिप्पणी आंबेडकर यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत मिळाल्याबाबत ‘भारतामध्ये एक पुरस्कार घेता आला नाही आणि छोट्या देशांना धमकावून पुरस्कार घेत आहेत,’ अशी टीका आंबेडकर यांनी केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेचा मुद्दा उपस्थित होत आहे, त्यावर आंबेडकर म्हणाले, ‘ध्वनी हा आता परिणाम करणारा घटक झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली डेसिबलची मर्यादा सर्वांनी पाळली पाहिजे. देवाच्या नावाने, लग्नाच्या निमित्ताने किंवा मोर्चाच्या निमित्ताने ध्वनिवर्धक वापरला तरी नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत.’
राहुल गांधींचा थेट संवाद नाही
‘लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाबाबत संवादाचा अभाव असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. विद्यार्थ्यांना आधी प्रश्न न देता त्यांच्याकडून थेट प्रश्न घेऊन राहुल गांधी यांनी त्यांना उत्तरे दिली असती, तर संवाद अधिक जिवंत झाला असता. सध्याच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद झाल्याचे दिसले नाही,’ अशी टिप्पणी आंबेडकर यांनी केली.
