पुणे : ‘विकासाची गंगा आपल्या दारात आणायची असेल, तर निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता संघटित होऊन राजकीय दहशत निर्माण करावी,’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटक्या-विमुक्त समाजाला सोमवारी केले. ‘राजकीय पक्षांना भटक्या-विमुक्तांच्या मतांची गरज आहे; मात्र भटक्या-विमुक्त समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नाही. त्यामुळे पक्षांची गुलामी न करता स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करा,’ असेही त्यांनी सांगितले.
भटक्या-विमुक्त दिनानिमित्त भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) अध्यक्ष कैलास कदम, विजय जाधव, मंगेश ससाणे, अरुण जाधव या वेळी उपस्थित होते. भटक्या-विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय व समाजातील मंत्री, अन्याय-अत्याचारांपासून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षण, स्वतंत्र कायमस्वरूपी आयोग, जातीनिहाय जनगणना आणि स्वतंत्र जनगणनेत भटक्या-विमुक्तांचा स्वतंत्र उल्लेख या प्रकारचे ठराव या वेळी मांडण्यात आले.
आंबेडकर म्हणाले, ‘आपला प्रतिनिधी का निवडून येत नाही, याचा समाजाने विचार केला पाहिजे. निर्णय घेण्याच्या ठिकाणी आपले प्रतिनिधी नसतील, तर आपल्या विकासाची चर्चा तरी कशी होणार? आमच्यावर अन्याय झाला, सरकारने आमच्यासाठी काही केले नाही, असा मुद्दा प्रत्येक वेळी सातत्याने मांडला जातो. मात्र, आपल्या हक्क्कांसाठी आपली लढण्याची तयारी असणे आवश्यक आहे. लढण्यासाठी मानसिकता आणि कल्पकता असेल, तर प्रश्न सोडवता येतात. लढलो तर सर्व काही मिळते, ही मानसिकता निर्माण झाली पाहिजे. मतदानाच्या वेळी मिळणाऱ्या प्रलोभनांना बळी न पडता आपल्या मताची ताकद दाखवा. मतांची राजकीय दहशत निर्माण झाली, तरच ‘मी तुमच्यासाठी काय करू शकतो?’ हा प्रश्न राजकीय नेत्यांना पडेल. स्वतःला विकणार नाही, अशी भूमिका घेतली तर आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल,’
‘इतर मागासवर्गीय, धनगर यांच्यासह विविध समाज आपल्या मागण्यांसाठी न्यायालयात जात आहेत. मात्र, कायदे करण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत. त्यामुळे सामाजिक प्रश्न केवळ न्यायालयाच्या माध्यमातून सुटणार नाहीत. त्यासाठी समाजाने विधिमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणले पाहिजेत. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग वाढविला पाहिजे,’ असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
