पुणे : ‘आपण ज्या समाजात राहतो. त्या आपल्याच भाऊबंदांचे काय सुरू आहे, हे जाणून घेतले पाहिजे. केवळ आपल्या स्वार्थापेक्षा दुसऱ्यांच्याही हिताचे काही करता येईल का, याचा विचार आपण करायला हवा,’ असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी मंगळवारी केले, तर सध्याच्या मुलांचा स्वभाव हट्टी होत असून, त्यांना नकार पचवायला शिकवले पाहिजे,’ असा सल्ला डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दिला.

भारती निवास सांस्कृतिक मंडळ, सुहास आणि अनिता कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारती निवास सोसायटीच्या कार्याध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी आमटे दाम्पत्याशी संवाद साधला. मंडळाचे अजित आगाशे, शैला पाध्ये, कौस्तुभ भंडारकर आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘आपण शहरात असतो. इथल्या धावपळीत आपल्याला आपल्या भाऊबंदांचे काय सुरू आहे, ते कसे दिवस काढत आहेत, याची कल्पनाही नसते. आपल्यापेक्षा जास्त पैसे असलेल्यांचे काय सुरू आहे. ते काय करत असतात, अशा गोष्टींकडेच लक्ष देतो. हे लहानपणापासूनच शिकवले जाते. मात्र, आपण ज्या समाजात राहतो, तेथे काय सुरू आहे, हे जाणून घेतले पाहिजे.’

‘गडचिरोलीच्या घनदाट जंगलात काम करताना निराशा येईल, अशी अनेक कारणे होती. मात्र, हा मी स्वीकारलेला मार्ग होता. बाबांनी मला हेमलकसाची जागा सुचवली. पण, काम मात्र माझे मीच निवडले होते. पैसे नव्हते. सोय नव्हती. वीजही नव्हती. त्याने कधीही निराशा आली नाही. मात्र, आम्ही ज्यांच्यावर उपचार करत होतो. ते धन्यवादही म्हणत नव्हते. या गोष्टीचा सुरुवातीला राग आलेला. कधी निराश झालोच तरीही व्यक्त करत नव्हतो. त्यानंतर हळूहळू आदिवासींच्या परंपरा समजून घेतल्या. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निराशा दूर होते,’ असेही त्यांनी नमूद केले. संजय गोखले यांनी आभार मानले.

‘मुलांना नकार पचवायला शिकवा’

‘आता मुलांच्या गरजा वाढल्या आहेत. कुटुंबातील संवादही कमी झाला आहे. मुले मोबाईलमध्येच गुंग दिसतात. त्यामुळे घडण्याच्या वयातच मुलांचे मोठे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी मोबाईलच्या वापराचा वेळ कमी झाला पाहिजे. कुटुंबातील सुसंवाद वाढवला पाहिजे. त्याचबरोबर गरजा कमी करायला हव्यात. त्याच्याकडे आहे म्हणून, मलाही तीच वस्तू हवी, असा हट्ट आता वाढलेला दिसतो. पण, आपण मुलांना नकार पचवायला शिकवले पाहिजे,’ असा सल्ला डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दिला.