पिंपरी : ‘हल्ली डॉक्टरी पेशा हा बदनाम झाला आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालये कार्यक्रमाला बोलवतात तेव्हा सध्या हे क्षेत्र बदनाम असून पुढच्या काळात त्याची स्थिती सुधारण्याची तुमच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे मी त्या तरुणांना आवर्जून सांगतो. दहा कोटी आदिवासी असून, त्यांच्यासाठी समाजाने काम करायला हवे,’ अशी अपेक्षा मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ उद्योगपती डॉ. लालासाहेब शिंदे यांच्या सफल जीवनाचे पूर्ण सत्य ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी रविवारी पिंपरी ते बोलत होते. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या डॉ. मंदाकिनी आमटे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, एल. व्ही. शिंदे ग्रुपचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘अपार कष्ट घेऊन डॉ. लालासाहेब शिंदे यांनी संस्था काढल्या आणि त्या चांगल्या चालवल्या. आता पुस्तकरुपाने त्यांचे कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. सार्वजनिक स्वरुपात होणारा शिष्याचा होणारा गौरव हा गुरुसाठी आनंदाचा दिवस आहे. शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यात माणसे जोडण्याच काम केले. पिंपरी-चिंचवड शहर हे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, निगडी हे पाच गावांचे मिळून झाले. स्थानिकांनीही सर्वांना साथ दिली. तेव्हा इथे चाळी होत्या. मग प्राधिकरण आले. या शहरात मोठ्या संख्येने सांगली, सातारा,कोल्हापूर, जळगाव,चिपळून येथून आलेले नागरिक स्थायिक झाले. आता शहर चांगले विकसित झाले आहे’.

या वेळी प्रकाश आणि मंदाकिनी आमटे या दांपत्याशी सोलापूरकर यांनी प्रश्नोत्तरे स्वरुपात संवाद साधला. माणसावर अस्वलाने केलेला हल्ल्याच्या प्रसंगाप्रमाणे अनेक प्रसंगी त्यांनी सांगितले. डॉ. शिंदे यांनी महारोगी सेवा समितीला १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश दिला. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सीमा वाघ यांनी आभार मानले.