पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ प्रगतीच केली नाही, तर जागतिक पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान म्हणजे या ११ वर्षांच्या अतुलनीय वाटचालीचा गौरव असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत बुद्धिजीवी संमेलन कासारवाडीत पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे, राहुल जाधव या वेळी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, ‘भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडत आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारने प्रत्येक स्तरावर काम केले आहे. ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास’ हे केवळ एक घोषवाक्य नसून, ते मोदी सरकारच्या कारभाराचे आणि भारताच्या विकासाचे मूलभूत तत्त्व आहे. पुढील काळातही देशाची ही विकासाची घोडदौड अशीच वेगाने सुरू राहील आणि भारत एका नव्या उंचीवर पोहोचेल.