पुणे :आजची पोरं प्रत्येक गोष्टीसाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहतात. पण या एआयचा मूळ ‘सोर्स’ काय?” हाच प्रश्न जेव्हा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एकाच वेळी १० वेगवेगळ्या एआय प्लॅटफॉर्म्सना विचारला, तेव्हा थेट ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चीच दांडी उडाली! दोन तास चाललेल्या या एआय वारील बौद्धिक चकमकीनंतर अखेर त्या १० ही एआय प्लॅटफॉर्म्सना जावडेकरांची माफी मागावी लागली! गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील एका कार्यक्रमात जावडेकरांनी हा ‘माफीनामा किस्सा’ सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय वाचन कक्षाचे ‘प्राध्यापक द. मा. मिरासदार ग्रंथ दालन’ असे नामकरण माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर आणि ग्रंथालयांचे अबाधित महत्त्व यावर भाष्य केले.
नेमका काय घडला AI चा किस्सा?
आपल्या भाषणात जावडेकर म्हणाले की, “आजकाल वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत असून मुले उत्तरे शोधण्यासाठी थेट AI चा आधार घेतात. शिक्षकही याचा वापर करतात. म्हणूनच मी काल दिवसभर एक प्रयोग करून पाहिला. एका विशिष्ट विषयावर ‘परप्लेक्सिटी’सह ए आयच्या १० प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर एकाच क्रमाने १०-१० प्रश्न विचारले.”
ते पुढे म्हणाले, “AI वर जी माहिती जास्त वेळा वाचली जाते, तीच वर दाखवली जाते. पण याचा अर्थ ती माहिती खरीच असेल असे नाही! प्रत्येकाचा एक विशिष्ट बायस असतो. मी जेव्हा सर्व प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या माहितीच्या ‘स्रोता’बद्दल सवाल केला, तेव्हा दोन तासांच्या अभ्यासानंतर माझ्या लक्षात आले की उत्तर न देता आल्यामुळे त्या दाही प्लॅटफॉर्म्सनी थेट माझी माफी मागितली!”
ग्रंथालय हेच अधिकृत माहितीचे उगमस्थान!’
सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर पसरणाऱ्या फेक बातम्या आणि ए आय यांच्या व्हिडिओंचा उल्लेख करत त्यांनी इशारा दिला की, डिजिटल तंत्रज्ञान नक्कीच वापरा, पण डोळे झाकून विश्वास ठेवू नका. एआय कडे अधिकृत स्रोतांची खात्री नसते, परंतु आपल्या ग्रंथालयांमध्ये मात्र नेहमीच प्रामाणिक आणि अधिकृत स्रोत उपलब्ध असतो हेच ग्रंथालयांचे खरे महात्म्य आहे.
या वेळी त्यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत प्रा. द. मा. मिरासदार आणि विविध विषयांवर केलेल्या वाचनांचा पुस्तकांचा संदर्भ देत ग्रंथालय हाच खात्रीशीर सोर्स असल्याचे सांगितले.
