पुणे : ‘द. मा. मिरासदार हे अत्यंत अभ्यासू आणि विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. मिरासदार आणि गरवारे महाविद्यालयातील गुरुजनांनी आम्हाला बहुश्रुतता देत घडविले. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला असला, तरी पुस्तकांद्वारे मिळणारी माहिती अधिकृत असते. त्यामुळे ग्रंथालयांचे महत्त्व आजही विशेषत्वाने जाणवते,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.साहित्यिक आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक द. मा. मिरासदार यांची जन्मशताब्दी; तसेच गरवारे महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय वाचन कक्षाचे ‘प्रा. द. मा. मिरासदार ग्रंथदालन’ असे नामकरण करण्यात आले. त्या वेळी जावडेकर बोलत होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रा. द. मा. मिरासदार जन्मशताब्दी समितीचे निमंत्रक हरिभाऊ मिरासदार, प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा आदी या वेळी उपस्थित होते. रवींद्र मंकणी निर्मित व प्रसाद मिरासदार दिग्दर्शित ‘माझी मिरासदारी’ हा द. मा. मिरासदार यांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला.

जावडेकर म्हणाले, ‘भारतीय ज्ञान परंपरेमध्ये मोठी ताकद आहे. देशात अनेक उत्तमोत्तम ग्रंथालये उपलब्ध होती. परंतु, मोगल आक्रमकांनी ग्रंथालये नष्ट केली. भारतीय ज्ञानपरंपरा पुढे जतन करण्यासाठी नॅशनल डिजिटल लायब्ररीचा उपक्रम राबविण्यात आला. पुस्तकांद्वारे मिळणारी माहिती अधिकृत असते.’

‘महाविद्यालयातील सायकल स्टँडचे शुल्क अचानक वाढविल्याने आम्हीदेखील त्या विरुद्ध आंदोलन करून निषेध नोंदविला. त्यामुळे ‘जेन झी’ ही संकल्पना आजचीच नाही, तर पूर्वापार चालत आलेली आहे,’ असे जावडेकर यांनी सांगितले.‘ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती पुन्हा एकदा निर्माण करणे आवश्यक आहे,’ असे गोखले म्हणाले. ‘द. मा. मिरासदार यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना राज्यातील प्रेक्षकांना खूप हसवत उत्तमोत्तम उपक्रम करण्याचा मानस आहे,’ असे पांडे यांनी सांगितले.राहुल मिरासदार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. देसर्डा यांनी आभार मानले.