पुणे : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादीं’तील कोणत्याही नेत्याशी संबंंध असणार नाही. आता काँग्रेसमध्ये राजकीय घुसमट झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेऊन समाजकारण करेन,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

‘लोकशाहीत नागरिकांच्या भावना, विचारधारा याबाबत तडजोड केल्यास मतदार मतदानातून राग व्यक्त करतात, हे या निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी ‘राष्ट्रवादी’ पक्षातील नेत्यांना टोला लगावला.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र येऊन निवडणूक लढविण्यास जगताप यांनी विरोध केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ते निवडून आले. विजयानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

जगताप म्हणाले, ‘मी २६ वर्षे ६ महिने ज्या पक्षात राहिलो, त्या पक्षातील नेत्यांचे सत्तेसाठी तडजोडीचे राजकारण आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या कुटिल कारस्थानांमुळे मी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्या, तर काय होणार आहे, हे दिसून आले होते. शहरस्तरावरील काही नेत्यांनी गडबड केली. वरिष्ठ नेत्यांचेही कटू अनुभव आले. त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.’

‘काँग्रेस पक्ष हा सत्तेतून दूर झाला असला, तरी सत्ता मिळवण्यासाठी भाजपबरोबर तडजोड करत नाही. त्यामुळे या पक्षात प्रवेश केला,’ असे त्यांनी सांगितले. तसेच ‘दोन्ही ‘राष्ट्रवादीं’तील कोणत्याही नेत्याशी, कार्यकर्त्यांशी वैर नाही. विचार जुळत नसल्याने बाहेर पडलो आहे. लवकरच काळ उत्तर देईल,’ असेही जगताप म्हणाले.

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी (शरद पवार) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या कारणामुळे नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तत्पूर्वी मला अनेक पक्षांकडून विचारणा झाली होती, असेही त्यांनी सांगितले. अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. तसेच त्यांच्या निकालाकडे लक्ष लागले होते.

वानवडी मतदारसंघातून जगताप विजयी झाल्यानंतर त्यांनी लोकसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्षने राहूल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश दिला, याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच भविष्यात सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना कठोर विरोध करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.