पुण्याच्या महापौरपदी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांची निवड झाली. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रशांत जगताप यांना ८४ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांना २५ मते मिळाली. मनसेने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेऊन तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला तर शिवसेनेचे उमेदवार सचिन भगत यांना त्यांच्या पक्षाची १२ मते मिळाली.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. महापालिकेतील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असून महापौरपदासाठी राष्ट्रवादीने प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी अर्ज दाखल केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रशांत जगताप यांच्या बाजूने मतदान केले.
महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन जगताप यांची महापौरपदासाठी निवड करण्यात आली. हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, असे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी यापूर्वीच सांगितले आहे.