Prashant Jagtap On Pune NCP Politics : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या अनुषंगाने युती आणि आघाडी करण्यासाठी राजकीय नेते पुढाकार घेताना दिसत आहेत. यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे.
तसेच जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपण पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात खळबळ उडाली असून पुण्यात राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.
प्रशांत जगताप काय म्हणाले?
“शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे किंवा अजित पवार असतील, यांच्यावर माझं प्रेम आहे आणि राहील. पण २०२३ मध्ये माझ्यावर दबाव असूनही मी शरद पवारांची साथ सोडली नाही. आज जर सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र येणार असतील तर माझा विरोध असल्याचं काही कारण नाही. ज्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित आघाडीची घोषणा होईल किंवा त्या आघाडीसाठी चर्चेची पहिली फेरी सुरू होईल त्या दिवशी मी पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देईन”, असं प्रशांत जगताप यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
प्रशांत जगताप यांनी काय भूमिका मांडली?
“पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवू. पण जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक निवडवण्याचा प्रश्न आला तर मी स्पष्ट सांगितलं आहे की, २०२३ आणि १९९९ साली देखील मला शरद पवार काही देतील यासाठी मी त्यांच्याबरोबर नव्हतो. शरद पवार यांची पुरोगामी चळवळीसाठी धडपड पाहता मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला”, अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली.
“उद्याच्या काळात महापालिकेच्या निवडणुकीत तिकडच्या चार लोकांचं भलं व्हावं आणि आमच्याकडील दोन लोकांचं भलं व्हावं अशा संकुचित भूमिकेसाठी मी चुकीचा निर्णय घेणार नाही. काल, परवा आणि उद्या देखील अजित पवार यांच्याशी आमचा कोणताही द्वेष नव्हता आणि नसेल. पण आमचा विषय हा पुरोगामी चळवळ आणि पुणे शहराचा विकास हाच आहे. पण शहर स्थरावरील जर एखाद्या कोणाला वाटलं की त्यांच्याबरोबर (अजित पवार) युती करावी तर त्यांचं ऐकायचं की नाही याचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ घेतील. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर मला विश्वास आहे. पण तरीही जर अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मी माझं राजकारण काही काळासाठी थांबवेल असा माझा निर्णय नक्की आहे”, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं.
रवींद्र धंगेकरांनी प्रशांत जगतापांना काय आवाहन केलं?
“प्रशांत जगताप यांच्या बाबतीत काही बातम्या माध्यमांमध्ये पाहिल्या, अर्थात आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा यांच्या संभाव्य युतीनंतर राजकारणातून विश्रांती घेण्याबाबतीत विचार करत असल्याचे समजते. आता पवारसाहेब आणि अजितदादा काय निर्णय घेतील ते माहित नाही, परंतु एक पुणेकर म्हणून अशी अपेक्षा की प्रशांत जगताप यांनी असा निर्णय घेऊ नये. या पुण्यनगरीच्या राजकीय पटलावर जेव्हा जेव्हा काही चुकीचे घडते तेव्हा तेव्हा आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे. आपल्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याने असा निर्णय घेऊ नये. आपल्या हातून या पुण्यनगरीची अजून खूप सेवा बाकी आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.
