निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाट्यमय घडामोडीनंतर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्ष बदलानंतरही जगताप यांनी विजयी परंपरा कायम राहिली आहे. सकाळपासून जगताप काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते, काहींमध्ये पिछाडीवर. शेवटच्या मिनिटांमध्ये जगताप यांनी बाजी मारली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार यामुळे जगतापांची नाराजी पुण्यासह राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.
प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते. त्यांनी आधी पासूनच शरद पवारांना साथ दिली. जवळपास २७ वर्ष ते शरद पवारांसोबत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही ते शरद पवारांसोबत होते.पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.पवारांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर जगताप यांच्या सारखा मोहरा आपल्या गळाला लावण्यासाठी सगळ्याच पक्षांनी प्रयत्न केले. पण जगताप यांनी काँग्रेसमध्येच जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
एकनाथ शिंदे तसंच उद्धव ठाकरे दोन्ही शिवसेना जगताप यांना पक्षात समाविष्ट करून घेण्यासाठी आतूर होते. परंतु जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सगळ्यांनाच धक्का दिला. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून जगताप राष्ट्रवादीत आहेत. पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून अनेक वर्ष काम केलं. वानवडी हा त्यांचा मतदारसंघ. २०१६-१७ मध्ये त्यांनी पुण्याचे महापौरपदही भूषवलं. २०२१ त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र २०२३ मध्ये पक्षात फूट पडली. शरद पवारांना अनेक नेते सोडून गेले. अजित पवारांच्या गटात एक एक नेता सहभागी होत होता. पण जगताप यांनी तेव्हा ही शरद पवारांची साथ सोडली नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच राहीले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांने त्यांना संधी दिली. २०२४ च्या निवडणुकीत ते हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मैदानात उतरले. यावेळी त्यांची लढत त्यांचेच एक वेळचे सहकारी चेतन तुपे यांच्या बरोबर झाली. तुपे यांना जगताप यांनी कडवी टक्कर दिली. पण त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला.
जगताप यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला ताकदवान नेता मिळाला. पक्ष प्रवेशानंतर जगताप यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे असे म्हटले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी “काँग्रेस” पक्षात कार्यरत होत आहे. भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला, आजही काँग्रेस पक्ष भारताला धार्मिक-जातीय द्वेषापासून मुक्त करण्यासाठी लढत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे, संविधानाच्या रक्षणार्थ बलाढ्य शक्तींना आव्हान देणारे राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने योगदान देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र यानंतरही त्यांनी राजीनामा दिला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची का काँग्रेसच्या तिकिटावर अशा दोलायमान स्थितीत जगताप होते. अखेर त्यांनी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता.
