पिंपरी : ‘शौचालयातील अस्वच्छता, चालक, वाहकांच्या विश्रांती कक्षातील दुरवस्था, बंद अवस्थेतील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आणि पिण्यासाठी उपलब्ध नसलेले पाणी, अशा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आगारातील विविध समस्यांवरून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पुढील महिन्यात पाहणीला येईल, तेव्हा आगार चकाचक दिसले पाहिजे. सर्व सूचनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी सक्त ताकीदही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

पिंपरी-चिंचवड आगाराची सरनाईक यांनी गुरुवारी पाहणी केली. खासदार श्रीरंग बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, भोसरीतील प्रशिक्षण संस्थेच्या महाव्यवस्थापक यामिनी जोशी,  विभाग नियंत्रक अरुण सिया, आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यावेळी उपस्थित होते. सरनाईक यांनी आगारातील शौचालये, चालक, वाहकांचा विश्रांती कक्ष, पाण्याची सुविधा, परिसरातील स्वच्छतेची अर्धातास पाहणी केली. शौचालयात अस्वच्छता दिसली. वाहक कक्षात सुविधा नाहीत. अंगोळीसाठी चालक, वाहकांना गरम पाणी दिले जात नाही. थंड पाण्याची व्यवस्था नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लटकेलेले होते. भिंती थुंकीने रंगल्याचे पाहणीत सरनाईक यांना दिसून आले.  त्यावरुन त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. किती अस्वच्छता आहे, आगारात मद्यपान करायला लोक बसतात? तर परिवहन विभागाचे लोक काय करतात? चालक, वाहकांना गरम पाणी का दिले जात नाही. प्रवाशांसाठी थंड पाण्याची व्यवस्था का केली नाही, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना केली.

‘सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षितता चालकांच्या हाती देतो. त्यांच्याकडून बारा तास काम करुन घेतो. चालकांना चांगल्या, दर्जेदार सुविधा देणे आवश्यक आहे. चालक, वाहकांच्या विश्रांती कक्षाची अवस्था वाईट आहे. अंगोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था ताबडतोब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ मागवून घेऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. स्वयंसेवी संस्थकडून सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) आगाराला कुलर दिले आहेत. त्याची जोडणी करुन कार्यान्वित करावेत. सर्व सुविधा महिन्याभरात देण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली आहे. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. पोलीस चौकीत एका पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. बस रस्त्यावर उभ्या करु नयेत’, अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना केली.

‘दौऱ्यामुळे थोडी जास्त स्वच्छता’

मंत्री सरनाईक येण्यापूर्वी आगारातील कर्मचाऱ्यांची स्वच्छतेची लगबग सुरु होती. साचलेले कचऱ्याचे ढीग उचलले जात होते. त्यावरुन सरनाईक म्हणाले, दौरा जाहीर केल्यामुळे थोडी जास्त स्वच्छता दिसत आहे. मंत्री येणार म्हटल्यानंतर स्वच्छता केली जाते. त्यामुळे स्वच्छतेत फरक पडतो. यापुढे नियमितपणे आगार स्वच्छ दिसले पाहिजे.  

गाळे बचत गटांना द्या

भाडेदर जास्त असल्याने आगारातील दहा व्यावसायिक गाळे बंद आहेत. त्यामुळे भाडे कमी करावे. महिला बचत गटांना गाळे उपलब्ध करुन द्यावेत. तिथे उपहारगृह झाल्यास ४० रुपयांमध्ये चहा, नाष्टा प्रवाशांना दिला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.