scorecardresearch

परावलंबित्व हेच स्त्रियांच्या दुर्बलतेचे कारण- प्रतिभाताई पाटील

‘‘स्त्रियांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. त्या मुळातच कोणावर तरी अवलंबून असतात. वडील, पती, मुले यांच्याशिवाय त्यांना राहता येत नाही. स्वत:ची भूमिका मांडता येत नाही.’’

स्त्रिया कायम दुसऱ्यावर अवलंबून राहतात, हेच स्त्रियांच्या दुर्बलतेचे प्रमुख कारण आहे, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी निगडीत व्यक्त केले. जर ५० टक्के स्त्रिया अबलाच राहिल्या तर देशाचा गाडा समर्थपणे चालणार तरी कसा, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
निगडी प्राधिकरणातील अनुष्का स्त्री साहित्य कला संमेलनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, तेव्हा त्या बोलत होत्या. डॉ. विजया वाड, आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक भारती फरांदे, उद्योजक अमित गावडे, शर्मिला महाजन आदी व्यासपीठावर होते.
पाटील म्हणाल्या,‘‘स्त्रियांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. त्या मुळातच कोणावर तरी अवलंबून असतात. वडील, पती, मुले यांच्याशिवाय त्यांना राहता येत नाही. स्वत:ची भूमिका मांडता येत नाही. अशा कारणांमुळेच महिलांना बरोबरीचे स्थान मिळत नाही. त्या दुर्बल ठरतात. स्त्री कुठल्याही अर्थाने कमी नाही. दु:ख सहन करण्याची सर्वाधिक ताकद स्त्रियांमध्येच असते. मात्र, सध्याची परिस्थिती का निर्माण झाली, याचा विचार केला पाहिजे. जागतिक पातळीवर लिंगभेद तसेच स्त्री-पुरूष समानतेवर नेहमीच चर्चा होते. महिलांनी एकाच सुरात महिलांच्या प्रश्नांवर बोलण्याची गरज आहे. लिंगभेद हा निसर्गानुसार आहे. घटनेने बरोबरीचा दर्जा दिला असला तरी मानसिकदृष्टय़ा समान दर्जा मिळायला हवा. आर्थिकदृष्टय़ा महिलांना सक्षम तसेच शिक्षित केले पाहिजे. देशात ५० टक्के महिला आहेत. त्या अबला राहिल्या तर देशाचा रथ चालणार कसा? पूर्णपणे विकास हवा असेल तर महिला व पुरूष समर्थ हवेत,’’ असे त्या म्हणाल्या.
‘देशोदेशी उत्सुकता’
आपण अनेक देशांमध्ये गेलो, तेथील प्रमुखांशी चर्चा केली. भारतात गरिबी आहे, तरी १२० कोटी लोक एकत्र कसे राहतात, असे ते नेहमी विचारतात. आपल्याकडे संस्कृती आहे, चांगले संस्कार आहेत. संतांची शिकवण आहे. त्यामुळे गरिबी असूनही शांतपणे रोजचे व्यवहार होत असतात, असे प्रतिभाताई पाटील यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2014 at 02:30 IST