संगीत नाटकांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर समाज परिवर्तनाचा संदेशही दिला. त्यामुळे आजही या कलेची गरज असून, त्याचे जतन होणे आवश्यक आहे. ही जबाबदारी रसिक, कलाकार व शासनाने घ्यावी, असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण प्रतिभा पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. देविसिंह शेखावत, विठ्ठलराव संकपाळ, एन. जी. कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. गायक आनंद प्रभुदेसाई यांना ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ देण्यात आला. त्याचप्रमाणे नाना मुळे, लताफत हुसेन काझी, पं. जयराम पोतदार, चंद्रकांत धामणीकर, राजश्री ओक, सुनीता गुणे व अजित भालेराव या कलाकारांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
पाटील म्हणाल्या, की संस्कृतीचा ठेवा जपण्याचे काम बालगंधर्व संगीत रसिक मंडळाकडून करण्यात येत आहे. संगीत नाटय़कलाचे जतन करण्याचे काम सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. बालगंधर्वानी संगीत नाटकांचे वेड रसिकांना लावले. त्यांनी या कलेला जिवंतपणा दिला, त्यात रस भरला. संगीत नाटकांमधून केवळ मनोरंजनच झाले नाही, तर अनेक सामाजिक विषयही त्यातून मांडले गेले. त्यामुळे या कलेचे जतन झाले पाहिजे. मात्र, बदलत्या काळात त्यात काही बदलही होणे गरजेचे आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या मागे लागून आजचा तरुण भरकटतो आहे. अशा काळामध्ये उत्तम समाजाच्या निर्मितीसाठी संगीत नाटकही एक परिणामकारक साधन आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साखवळकर यांनी केले. सूत्रसंचालन अनुराधा राजहंस यांनी, तर आभार प्रदर्शन आवंती वायस यांनी केले.