पुणे : लोणी काळभोर भागातील एका तेल कंपनीच्या आगारातील टँकरमधून पेट्रोल – डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले.

टोळीप्रमुख प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय ५१, रा. संतोषी बिल्डींग, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर), विशाल धानाजी धायगुडे (वय ३१), बाळू अरुण चौरे (वय ३०, दोघे रा. सिद्राममळा, लोणी काळभोर ), इसाक इस्माईल मचकुरी (वय ४२, रा. संभाजीनगर, लोणी काळभोर), संकेत अनिल शेंडगे (वय ३९, रा. माऊली‌ अपार्टमेंट, गुजर वस्ती, लोणी काळभोर), राजू तानाजी फावडे (वय ३२, रा. कदमावाक वस्ती, लोणी काळभोर), नवनाथ बबन फुले (वय ३१, रा. रामदरा रस्ता, लोणी काळभोर), आतिश शशिकांत काकडे (वय ३१, रा. कोळपे वस्ती, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – पुणे : अबब!…पोलीस भरतीसाठी रस्सीखेच, पदे १२१९ अर्ज पावणेदोन लाख

लोणी काळभोर परिसरात एका तेल कंपनीचा डेपो आहे. या डेपोतून पेट्रोल – डिझेल टँकरमध्ये भरून राज्यातील वेगवेगळ्या भागात विक्रीस पाठविले जाते. मडीखांबे आणि साथीदारांनी टँकर चालकांशी संगनमत करून पेट्रोल – डिझेल चोरीचे गुन्हे केले होते. मडीखांबे आणि साथीदारांना लोणी काळभोरसह पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. संबधित प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्याकडे पाठविण्यात आला. राजा यांनी मडीखांबे याच्यासह आठ साथीदारांना तडीपार करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – ऑनलाइन भाडेकराराचे दावे आता वेगाने निकाली, भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती

पेट्रोल – डिझेल चोरीतून कोट्यवधींची मालमत्ता

प्रवीण मडीखांबे लोणी काळभोर भागात ‘ऑईल माफिया’ म्हणून ओळखला जातो. मडीखांबे आणि साथीदारांनी तेल कंपनीच्या आगारातून पेट्रोल – डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना हाताशी धरून पेट्रोल चोरीचे गुन्हे केले. चोरीतून मिळालेल्या पैशांतून मडीखांबे आणि साथीदारांनी मालमत्ता खरेदी केली आहे.