इंदापूर : सोनई उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूरमधील राजकारणात रंगत येणार आहे.
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करण्यात आला. माने यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, राजेश जामदार, बाबासाहेब चवरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, ऐन निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने पाटील यांना उमेदवारी दिल्याने माने हे नाराज झाले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यांनी सुमारे ३८ हजार मते घेतली होती. त्यामुळे पाटील यांना पराभव पत्करावा लागला. क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री दत्तात्रण भरणे हे विजयी झाले. आता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदापूरमधील राजकीय गणिते बदलली आहेत.
‘इंदापूर विधानसभा निवडणूक कोणत्याही पक्षाचे चिन्ह आणि मोठ्या नेत्याचा पाठीवर हात नसताना लढवून ३८ हजार मते मिळविली. पुणे जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम करत असताना ३०० कोटी रुपयांचा निधी इंदापूर तालुक्यामध्ये आणला. आगामी काळात भाजपच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. माझे वडील दशरथ माने यांनी सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग सुरू केले. त्याद्वारे २५ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.’ असे माने म्हणाले.