पुणे : रांगडा अभिनय, अनोखी शैली आणि ‘मुळशी पॅटर्न’सारख्या चित्रपटांतून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या एका कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. पुण्यातील ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात तरडेंनी केलेल्या भाषणाला पुणेकरांनी भरभरून दाद दिली.

याच कार्यक्रमात प्रवीण तरडे यांनी उलगडलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि ३० वर्षांपूर्वीची एका आठवणीची चांगलीच चर्चा झाली. ‘त्यावेळच्या परिस्थितीमुळे माझ्या आयुष्यात कधी व्हॅलेंटाईन असेल, असं मला कधी वाटलंच नव्हतं,’ अशा शब्दांत तरडे यांनी आपल्या भावनां व्यक्त केल्या आणि उपस्थित पुणेकर अवाक झाले.

या वेळी मंचावर प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, गायक महेश काळे आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे उपस्थिती होत्या. या सर्वांसमोर प्रवीण तरडेंनी केलेल्या भाषणाने रसिकांची मने जिंकली. मात्र, त्यांनी सांगितलेला एक किस्सा सगळ्या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला.

तरडेंचं ‘व्हॅलेंटाईन’ कोण?

आजच्या पिढीसाठी १४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस, पण प्रवीण तरडे यांच्यासाठी हा दिवस कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट होता. या दिवशी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगताना तरडे म्हणाले,‘मी १४ फेब्रुवारी १९९५ ला पहिल्यांदा फिरोदिया स्पर्धा केली. रंगभूमी आणि रंगमंच पहिल्यांदा फिरोदियामुळेच पाहिला. म्हणजे आमच्या आयुष्यात व्हॅलेंटाईन या पद्धतीने आला. त्या काळात माझी परिस्थिती पाहता, माझ्या आयुष्यात व्हॅलेंटाईन असेल, असं कधी वाटलं नव्हतं. पण, मागची ३० वर्षं, आजही १४ फेब्रुवारी हा दिवस आला, की मला फिरोदिया करंडकची आठवण येते. त्यामुळे माझं व्हॅलेंटाईन काय असेल ते… या स्पर्धेमुळे आहे.’

यंदा फिरोदियामध्ये सादर करण्यात आलेल्या पहिल्या तीन एकांकिका प्रचंड आवडल्याचेही तरडे यांनी नमूद केले. ते म्हणाले,‘अप्रतिम एकांतिका आज पाहायला मिळाल्या. या निमित्ताने बेगम अख्तरी असतील, बाबुराव पेंढारकर हे या पिढीला माहिती आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचत आहे. काही दृश्ये अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीत.’

भावेंनी दिला यशाचा कानमंत्र

या कार्यक्रमात सुबोध भावे यांनी आलेले अनुभव सांगत विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. ‘मला कधी फिरोदिया किंवा पुरुषोत्तममध्ये बक्षीस मिळालं नाही. पण, त्यावाचून माझं नडलं नाही. या स्पर्धांमध्ये भाग घेतला, तिथेच मी जिंकलो होतो. केवळ जिंकण्यासाठी म्हणून स्पर्धा केल्या नाहीत. या स्पर्धेमुळेच मला बालगंधर्व आणि काशिनाथ घाणेकर यांच्यासारख्या भूमिका करण्याची ताकद मिळाली,’ असे भावे यांनी नमूद केले.

सादरीकरणाचे कौतुक

स्पर्धेतील सादरीकरणाचे कौतुक करताना महेश काळे म्हणाले, ‘एका नाटकातून आपल्या वारशाबद्दल असलेला अभिमान दिसला. दुसरा, मराठी सृजनशील असलेल्या आपल्या पूर्वजांबद्दलच कौतुक, अभिमान दिसला आणि तिसऱ्या ठिकाणी तंत्रज्ञान किंवा नवीन जगामध्ये सामील होत असतांना, त्यात आपली मराठी माणसाची व्यथाही स्पष्टपणे दिसली.’

सांस्कृतिक वैभवासाठी महापौरांचं आश्वासन

‘सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहर ओळखले जाते. महापालिकेकडून शहरात अनेक संस्कृतिक उपक्रम राबवले जातात. सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, अद्यापही अनेक छोटी सभागृहे पूर्ण क्षमतेने वापरली जात नाहीत,’ अशी खंत महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली. ‘आगामी काळात तरुण मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील. पुण्याच्या सांस्कृतिक विकासासाठी महापालिका सर्वतोपरी मदत करेल. त्यासाठी कलाकारांनीही पुढाकार घ्यावा, प्रशासनाला मदत करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.