मिणमिणत्या पणत्यांचा तेजोमय प्रकाश.. पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेला शनिवारवाडा.. प्रकाशाप्रमाणे आमच्याही आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रगतीची वाट उज्ज्वल होऊ दे, अशी प्रार्थना करणारे चिमुकले.. ऐतिहासिक शनिवारवाडा प्रांगणाने हे अनोखे वातावरण अनुभवले.
सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे ‘समाजातील अनाथ आणि वंचित मुलांसाठी दीपप्रार्थना’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. धर्मराज साठे, अलायन्स क्लब ऑफ पुणेचे किरण कोठारी, निंबाळकर तालीम मंडळ ट्रस्टचे सुरेश पवार, नवग्रह मित्र मंडळाचे मानसिंग पाटोळे, मििलद शालगर आणि शाहीर हेमंत मावळे या वेळी उपस्थित होते. समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी सामाजिक संस्थांमधील मुलांसमवेत दीपप्रार्थना केली जाते. या उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष होते.
दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी संतुलन पाषाण शाळा, आपलं घर, लुई ब्रेल संस्था आणि सह्य़ाद्री मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्टमधील मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे, सुगंधी उटणे आणि दिवाळीचा फराळ देण्यात आला. नटरंग कला अकादमीच्या कलाकारांनी या मुलांसाठी नृत्य सादर केले. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष तन्मय तोडमल, गणेश सांगळे, राजेश भोर, नितीन होले, प्रशांत जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.