scorecardresearch

पावसाळापूर्व कामे संथ गतीने ; नालेसफाईची कामे आठ टक्के

पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू करण्यात आली असली, तरी या कामांचा संथ वेग पाहता कामे मुदतीमध्ये पूर्ण होण्याबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे : पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू करण्यात आली असली, तरी या कामांचा संथ वेग पाहता कामे मुदतीमध्ये पूर्ण होण्याबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंत नालेसफाई आणि पावसाळी गटारे-वाहिन्या स्वच्छतेची केवळ आठ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
दरवर्षी पावसाळापूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या आणि गटरांची स्वच्छता केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर निविदा मागविली जाते. मात्र कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण होत नसल्याने आणि घाईगडबडीत कामे होत असल्याने कामांचा दर्जा निकृष्ट होत आहे. परिणामी पावसाळय़ात अनेक भागात पाणी तुंबण्याच्या घटना अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने घडल्याचे समोर आले होते. त्यामुळे यंदा नालेसफाई आणि पावसाळा पूर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून मे महिनाअखेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी जाहीर केले होते. मात्र कामांचा वेग पाहता मुदतीमध्ये कामे पूर्ण होण्याबाबत साशंकतता आहे.
नाल्यांमध्ये ७६ धोकादायक ठिकाणे आहेत. त्यापैकी १४ ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली आहे. ३७३ कल्व्हर्टपैकी ४७ कल्व्हर्टची साफसफाई झाली आहे.
एकूण तीन लाख २५ हजार २६२ मीटर लांबीच्या पावसाळी गटारांपैकी २६ हजार ७६८ गटारांची तर ५५ हजार ३०० चेंबर्सपैकी ६ हजार ३६१ चेंबरची स्वच्छता झाली आहे. पावसाळी गटारांचे एकूण काम ८.२३ टक्के पूर्ण झाली आहे. शहरात २२ हजार १५१ मीटर लांबीचे नाले आहेत. त्यापैकी एक हजार ७१९ मीटर नाल्यांची स्वच्छता झाली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
गटारे, नाले
पावसाळी गटारांची एकूण लांबी – ३,२५,२६२ मीटर
नाल्यांमधील धोकादायक ठिकाणे – ७६
कल्व्हर्ट – ३७३
चेंबर – ५५,३००

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pre monsoon works slow pace eight per cent non cleaning works amy

ताज्या बातम्या