पुणे : खासगी पूर्वप्राथमिक शाळांतील प्रवेशांबाबत एकसमान आणि सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. पूर्वप्राथमिक प्रवेशांसाठी पालक-विद्यार्थ्यांच्या मुलाखती, अनावश्यक कागदपत्रांची मागणी, प्रवेशासाठीचे आर्थिक व्यवहारांबाबत मनविसेने प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून, मार्गदर्शक सूचना जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या मागणीची दखल घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘नामांकित शाळांमध्ये प्रवेशाचा मुख्य टप्पा हा पहिली इयत्तेऐवजी पूर्वप्राथमिक स्तरावर सुरू होतो. त्यामुळे या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यास विद्यार्थी, पालकांवर अन्याय होऊ शकतो. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एजंटांचे मोठे जाळे कार्यरत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. या प्रवेशांसाठी लाखो रुपये देणगीची मागणी होत आहे. काही शाळांकडून पालकांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, उत्पन्नाची माहिती, आयकर विवरणपत्रे, पालक-कुटुंबाची छायाचित्रे, व्यवसायाची माहिती अशी अनावश्यक कागदपत्रे मागवली जातात, तसेच ‘इंटरॲक्टिव्ह सेशन’ आणि ‘काउन्सिलिंग’च्या नावाखाली पालक, मुलांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. आर्थिक व्यवहारांबाबतच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करून कठोर कारवाई करावी,’ असे मनविसेने निवेदनात नमूद केले आहे.

शाळांच्या प्रवेश प्रक्रियेवर शासनाचे प्रभावी नियंत्रण नसणे, प्रवेशाच्या जागांची व निवड प्रक्रियेची पारदर्शक माहिती उपलब्ध नसणे आणि लॉटरीसारख्या निष्पक्ष निवड पद्धतीचा अभाव यामुळे अशा गैरव्यवहारांना वाव मिळत आहे. त्यामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १३, इतर कायदे, शासन निर्देशांचा विचार करून पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची निश्चित यादी, मुलाखती व निवड चाचण्यांवरील निर्बंध, पारदर्शक निवड पद्धत आणि शाळांच्या प्रवेश प्रक्रियेवरील नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती जाहीर करावी, नियमबाह्य मुलाखती, भेदभावपूर्ण निवड प्रक्रिया आणि बेकायदेशीर प्रवेशांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थी व पालकांची फसवणूक सहन केली जाणार नाही, असे मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी निवेदनात नमूद केले.

पूर्वप्राथमिक प्रवेश प्रक्रियेबाबतच्या मागणीची दखल घेऊन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येत आहे. येत्या आठवड्याभरात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालक