पुणे : कॅमेरून देशातील महिलेला आधी गर्भधारणेदरम्यान गंभीर गुंतागुंत झाली होती. त्यामुळे तिला माता बनण्यात समस्या येत होत्या. प्रत्येक प्रसूतीवेळी येणाऱ्या अडचणीमुळे तिने अखेर भारतात येऊन उपचार घेण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील डॉक्टरांनी या महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिचे गर्भाशय वाचविले. यामुळे या महिलेचा माता बनण्याचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. कॅमेरुन देशाची रहिवासी असलेली ग्लॅडीस ही व्यवसायाने शिक्षिका आहे. तिची पहिली गर्भधारणाही फार गुंतागुतीची होती. पहिल्या गर्भधारणेदरम्यान तिची प्रकृती खूपच नाजूक होती. त्यानंतरच्या गर्भाधारणेवेळी दुसऱ्या तिमाहीत तिने आपले बाळ पुन्हा एकदा गमावले. या गर्भपातानंतर गर्भातील बाळाच्या नाळेचा एक भाग गर्भाशयातच राहिला. त्यामुळे तिला फार रक्तस्राव झाला. पहिल्या गर्भधारणेमध्ये निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे या महिलेच्या दुसऱ्या गर्भधारणेतही समस्या निर्माण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कॅमेरुनमध्ये गर्भाशयात गर्भनाळेचा राहिलेला भाग काढून टाकण्यासाठी डॉक्टरांनी तीनदा प्रयत्न केले. मात्र, प्रत्येक वेळी तीव्र रक्तस्राव झाला आणि तिला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. अखेर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिला गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला. परंतु, तिने गर्भाशय काढून टाकण्यास विरोध दर्शवला. पुढील उपचार भारतात घेण्याचे ठरवले. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाच्या शिवाजीनगर येथील मॉमस्टोरी विभागाच्या प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ विभागाच्या संचालिका डॉ. सुप्रिया पुराणिक यांचा सल्ला तिने घेतला. त्यानंतर डॉ. पुराणिक आणि त्यांच्या पथकाने या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

भविष्यात गर्भधारणा झाल्यानंतर यशस्वी प्रसूतीनंतर निरोगी बाळ जन्माला यावे, आणि गर्भाशयाच्या कमजोरीमुळे होणाऱ्या भविष्यातील गर्भपातांना टाळता यावे यासाठी डॉक्टरांनी रुग्णाच्या गर्भाशयाच्या मुखाला सर्जिकल टाके घातले. यावेळी महिलेच्या गर्भाशयाची पुनर्रचनाही करण्यात आली. या शस्रक्रियेमुळे महिलेला इतर महिलांप्रमाणे सामान्य गर्भाशय मिळाले. यासह, गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे शारीरिक घटकही पुनस्थापित झाले. त्यामुळे ती आता माता बनू शकणार आहे, अशी माहिती डॉ. सुप्रिया पुराणिक यांनी दिली.

अशा पद्धतीने शस्त्रक्रिया

– लॅपारोटॉमी आणि अधेसिओलिसिस – डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेच्या मदतीने महिलेच्या शरीराच्या आतील गाठी काढल्या.

– बायलॅटरल इंटर्नल इलियाक अँड यूटेरीन आर्टरी लीगेशन – यात गर्भाशयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बांधल्या गेल्या. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी झाला.

– हिस्टरोटॉमी – गर्भाशयात अडकलेले ऊतक काढण्यासाठी ही प्रक्रिया केली. यात गर्भाशयाला छेद देण्यात आला. परिणामी, महिलेच्या शरीरात संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– मायोमेक्टॉमी – गर्भाशयातील गाठी काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे गर्भाशयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली.