पुणे : देशात एकूण गर्भवतींपैकी सुमारे ५२ टक्के महिला रक्तक्षयाने ग्रस्त आढळून येतात. रक्तक्षयामुळे मातेच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात. अनेक वेळा माता अथवा बालमृत्यूचे हे महत्त्वाचे कारण ठरते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भवतींची हिमोग्लोबीन पातळी तपासून, त्यांच्या रक्तवाढीसाठी लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

मातृत्व हा महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याने त्यांचे आरोग्य व पोषण योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. देशात गर्भवतींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. रक्तक्षयामुळे गर्भवतीच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात. एकूण रक्तक्षय असणाऱ्या गर्भवतींपैकी ३ ते ५ टक्के मातांना तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय आढळून येतो. अशा तीव्र रक्तक्षय आढळणाऱ्या सर्व गर्भवतींची हिमोग्लोबीन पातळी तपासण्यात येणार आहे. त्यांना गरजेनुसार वैद्यकीय देखरेखीखाली रक्तवाढीसाठी लसीद्वारे आयर्न सुक्रोज अथवा फेरिक कार्बोक्सीमाल्टोज देण्याची मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत गर्भवतींची चौथ्या महिन्यानंतर तपासणी करून तीव्र रक्तक्षय असणाऱ्या मातांना शासकीय आरोग्य संस्थेत मोफत उपचार देण्यात येत आहेत. काही गरजू मातांना रक्तसंक्रमण करून उपचार दिला जातो. या उपचारपद्धतीमुळे रक्तपातळीत वाढ होऊन मुदतीआधीची प्रसूती, प्रसूतिपश्चात रक्तस्राव अशी गुंतागुंत कमी होऊन मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. याशिवाय गर्भवती मातेला चौरस लोहयुक्त आहार, वैयक्तिक स्वच्छता, वेळेत सर्व तपासण्या व संदर्भ सेवा यासाठी समुपदेशनही करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

बालकांसाठी विशेष अभियान

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा मुलांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधण्यासाठी राबविला जातो. या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंद घालण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत विशेष अभियान ८ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये १७ फेब्रुवारीपर्यंत ३३४ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि २ हजार २४० बालकांवर इतर शस्त्रक्रिया (हर्निया, क्लेफ्ट लिप इ.) करण्यात आलेल्या आहेत.

४ हजारांहून अधिक गर्भवतींची तपासणी

गर्भवतींची रक्तक्षय तपासणी या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था व महापालिका रुग्णालयांमध्ये यामध्ये १ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान गर्भवतींची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ४ हजार ३७२ गर्भवतींना तीव्र रक्तक्षयाचे निदान झाले आहे. त्यांपैकी ३ हजार ९६३ गर्भवतींना आयर्न सुक्रोज अथवा फेरिक कार्बोक्सीमाल्टोजची लस देण्यात आली. या गर्भवतींच्या रक्तपातळीत अपेक्षित वाढ होईपर्यंत आवश्यक तपासण्या व पाठपुरावाही आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिली.