महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार प्रेमानंद गज्वी यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. वैजनाथ महाजन यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला असून अडीच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
परिषदेच्या ११० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.
परिषदेच्या फलटण शाखेला राजा फडणीस पुरस्कृत मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मसाप िपपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे आणि माजी कोशाध्यक्ष ह. ल. निपुणगे यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २७ मे रोजी परिषदेच्या वर्धापनदिनी साहित्यिकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे, असे प्रकाश पायगुडे यांनी सांगितले.