पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. रिक्षाचालकांकडून सुरू असलेली ही लूट रोखावी, अशी तक्रार रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे. अखेर प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकावरील प्रीपेड बूथ लवकच सुरू केले जाणार आहे. ही सेवा मोबाईल उपयोजनाद्वारे देण्याचा प्रस्ताव आहे.

रेल्वे स्थानकावरील प्रीपेड रिक्षा बूथ करोना संकटाच्या काळात सुरू होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते बंद झाले. प्रीपेड बूथ बंद झाल्यानंतर काही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारण्यास सुरुवात केली. याबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. अखेर चार वर्षांनी प्रीपेड बूथ पुन्हा सुरू करण्याची पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबत रेल्वे, वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) अधिकारी आणि रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात नुकतीच बैठक झाली.

हेही वाचा…आमच्या समस्या सोडवा! पिंपरी-चिंचवडमधील उद्योग संघटनांचे थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे

या बैठकीत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रीपेड बूथ सुरू करण्याची भूमिका मांडली. रिक्षा संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. अनेक रिक्षाचालक बेकायदा पद्धतीने स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करीत आहेत. अशा चालकांना आळा घालण्यासाठी प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करावा, अशी मागणीही संघटनांनी केली. बेकायदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडून होणारी लूट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. रिक्षा संघटनांनी मोबाईल उपयोजनाद्वारे ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. या उपयोजनाचे व्यवस्थापन रिक्षा संघटनाच करतील, अशीही भूमिका मांडण्यात आली.

हेही वाचा…मोसमी पाऊस दोन दिवसांत राज्यभर, पुढील दोन आठवडे पावसाचा जोर

बूथसाठी लवकरच जागेचे सर्वेक्षण

रेल्वेच्या प्रतिनिधींनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा बैठकीत मांडला. यासाठी स्थानक परिसरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रीपेड रिक्षा बूथची जागा ठरविण्यासाठी लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. याचबरोबर भाडे निश्चित करून तो प्रस्ताव मंजुरीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर मांडण्यात येईल, असे आरटीओच्या प्रतिनिधींनी सांगितले.