चिन्मय पाटणकर

नवं शैक्षणिक वर्ष सुरू होताच महाविद्यालयीन नाटय़कर्मीना वेध लागतात ते पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे.. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकांकिका सादर करण्यासाठीच्या चर्चा, तालमी महाविद्यालयांमध्ये रंगू लागल्या आहेत.

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा म्हणजे तरुणांचा सळसळता उत्साह, सर्जनशील कलाकृती निर्माण करण्याची धडपड, नवा प्रयोग आणि अर्थपूर्ण आशयनिर्मितीसाठी महत्त्वाचं व्यासपीठ .. नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात होतानाच अभ्यासाइतकीच महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे, ती चर्चा म्हणजे एकांकिका करण्याची! आंतरमहाविद्यालयीन नाटय़जल्लोषासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी सज्ज आहेत.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे एकांकिकेचा विषय निवडण्यापासून तांत्रिक बाजूंची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे जेमतेम महिनाभराचाच कालावधी आहे. प्राथमिक फेरीत ५१ महाविद्यालयांना एकांकिका सादरीकरणाची संधी मिळणार असल्याने प्रत्येक महाविद्यालयातील नाटय़मंडळ उत्साहाने कार्यरत झाली आहेत. काही महाविद्यालयांमध्ये विषय ठरवून लेखनाची प्रक्रिया सुरू आहे, काही ठिकाणी नवे कलाकार निवडण्यात येत आहेत, तर काही महाविद्यालयांमध्ये तालमींचीही सुरुवात झाली आहे.

गतवर्षीच्या पुरुषोत्तम करंडक विजेत्या नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाचा विशाल साठे म्हणाला, ‘यंदा आम्ही एकांकिकेसाठी आजूबाजूचाच विषय निवडला आहे. एकांकिकेचं लेखन पूर्ण झालं आहे. तालमीही सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या विजेत्या संघातील काही विद्यार्थी या वर्षीही आहेत, तर काही नव्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी करंडक मिळाल्याचं या वर्षीच्या संघावर काही प्रमाणात दडपण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलग दोन वर्षे नगरच्या महाविद्यालयांनी करंडकावर नाव कोरलं आहे. त्यामुळे या वर्षीसाठीही आम्ही जोमानं तयारी करत आहोत. अर्थात पारितोषिकाचा विचार करण्यापेक्षा चांगले नाटक करण्यावर भर आहे.’

‘विषय ठरवून आता आम्ही लेखनाच्या टप्प्यावर आहोत. एकांकिकेसाठी आम्ही निवड चाचणी घेऊन कलाकारांची निवड केली. या कलाकारांना घेऊन सध्या इम्प्रोवायझेशन्स सुरू आहेत. एकांकिकेच्या विषयात गेल्या वर्षीपेक्षा वेगळेपण. गेल्या वर्षी आठ वर्षांनी

अंतिम फेरी गाठण्यात आणि पारितोषिक मिळवण्यात यश मिळालं होतं. त्यामुळे यंदा त्याचं दडपण आहेच, पण कामगिरीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असेल,’ असं मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या मुकुल ढेकळेनं सांगितलं.

एकांकिकेची संकल्पना निश्चित झाली आहे. समकालीन विषयाची निवड केली आहे. सध्या एकांकिकेच्या लेखनाची प्रक्रिया सुरू आहे. लेखन पूर्ण झालं, की त्यानंतर आमच्या प्रत्यक्ष तालमी सुरू होतील, असं आयएलएस विधी महाविद्यालयाच्या अनुराधा महालेनं सांगितलं.