पुणे : व्यासपीठावर मध्यभागी बसलेली उत्सवमूर्ती प्रेरणा. तिच्या गौरवार्थ होत असलेली भाषणे. मात्र, श्रवणशक्ती नसलेल्या प्रेरणाला पहिल्या रांगेत बसलेल्या आईने सांकेतिक भाषेतून कार्यक्रमाचा वृत्तान्त कथन केला आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. हे अनोखे दृश्य डोळ्यांत साठवून घेणाऱ्या उपस्थितांना ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ओवीची प्रचिती शनिवारी आली.
निमित्त होते दृष्टीहीन, मूकबधिर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे. आडकर फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कर्णबधिर भरतनाट्यम् नृत्यांगना प्रेरणा सहाणे-दीक्षित यांना जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते डाॅ. हेलन केलर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कथक नृत्यगुरु मनीषा साठे, प्रमोद आडकर आणि मैथिली आडकर या वेळी उपस्थित होत्या.
साठे म्हणाल्या, ‘कलेत दृश्य आणि श्राव्य माध्यमाचे महत्व कलाकार आणि प्रेक्षकांसाठी अत्यंत गरजेचे असते. नृत्य कलाकार रंगमंचाच्या माध्यमातून चित्राकृती उभी करत असतो. ऐकण्याचा दोष असतानाही प्रेरणा समर्थपणे नृत्याविष्कार साकारत असून तिचा प्रवास जिद्दीने पूर्ण करत आहे. प्रेरणाचा सत्कार म्हणजे तिच्या जिद्दीचा, कष्टाचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. तिच्या यशात आई-वडिलांचे समर्थ पाळबळ आणि गुरूंचे प्रयत्न मोलाचे आहेत. प्रेरणाची शारीरिक मर्यादा ही तिच्या प्रवासासाठी जिद्द बनली आहे. तिच्यासाठी क्षितिजही अपुरे पडणार आहे. मनाची कवाडे उघडी ठेवून तिने नृत्य आत्मसात केल्यास तिला अत्युच्च यश प्राप्त होईल.’
प्रेरणाच्या वतीने त्यांच्या मातोश्री डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, डॉ. हेलन केलर यांच्या प्रेरणेतूनच प्रेरणाला जगण्याची जिद्द मिळाली आणि ती स्वत:ला स्वीकारत पुढे वाटचाल करू लागली. नृत्यगुरू शुमिता महाजन यांच्या भेटीने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. संगीत-सूर-ताल ऐकू न येणाऱ्या प्रेरणाला त्यांनी अथकपणे १६ वर्षे मार्गदर्शन करत अनेक प्रयोगांद्वारे सिद्ध केले. प्रेरणा भारतातील एकमेव शुद्ध शास्त्रीय भरतनाट्यम् नृत्य करणारी मूकबधिर कलाकार आहे.’
मोरे म्हणाले, ‘संगीत, साहित्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात नृत्य कलेला पुरेसे प्रोत्साहन मिळाले नाही. श्रवणशक्ती नसताना प्रेरणाला नृत्यासाठी सर्व शरीराने साथ देत ही उणीव भरून काढण्याचे काम केले. या पुरस्काराच्या माध्यमातून सुदृढ लोकांनाही प्रेरणा मिळू शकते.
राजकुमार सुराणा यांनी मानपत्राचे वाचन केले. प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, सुजाता पवार, वासंती वैद्य, अंजली देसाई, अजय जोशी, सचिन हनमघर, साजल पिलाने, सुजित कदम यांचा सहभाग होता.
