पुणे : अभिजात कलेचे संवर्धन हीच रवी परांजपे यांना श्रद्धांजली ; श्रद्धांजली सभेत विद्यार्थी, मित्र, सुहृदांची भावना

कलेच्या गुणवत्तेबाबत रवी परांजपे यांचा आग्रह सर्वांच्या परिचयाचा होता.

ravi paranjape
( संग्रहित छायचित्र )

कलेच्या गुणवत्तेबाबत रवी परांजपे यांचा आग्रह सर्वांच्या परिचयाचा होता. कलेची गुणवत्ता त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. केवळ चित्रकला नव्हे तर लेखणी आणि शब्दांच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम मोठे आहे. अभिजात कलेचे संवर्धन हीच परांजपे यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना त्यांचे विद्यार्थी, कुटुंबीय आणि सुहृदांनी रविवारी व्यक्त केली.

परांजपे यांच्या स्मृती जागवण्यासाठी रविवारी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी स्मिता, मुलगा रोहित, गायक शौनक अभिषेकी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर आणि विद्यार्थी, मित्र उपस्थित होते. गोपाळ नांदूरकर म्हणाले, रवी परांजपे यांना केवळ वास्तवदर्शी कला नव्हे तर मूर्त आणि अमूर्त कलाकृतींची अपेक्षा होती. मूर्त स्वरुप म्हणजे फुलाचा आकार तर अमूर्तता म्हणजे त्या फुलाचा सुगंध असे ते म्हणत. परिपूर्ण फूल हे रंग रूप आकारासह सुगंधही देते, त्यामुळे तीच खरी कलाकृती असे ते म्हणत. परांजपे यांचे लेखन संकलित करुन त्याचे पुस्तक केले असता नवोदित चित्रकारांना दिशा मिळेल असेही नांदूरकर म्हणाले.

लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी परांजपे फाउंडेशनला १० लाख रुपयांची देणगी दिली. ठाकूर म्हणाले, परांजपे हे बेळगावचे असल्याने त्यांच्याशी विशेष स्नेह होता. बेळगाव येथे परांजपे यांच्या नावाचे कलादालन उभारण्याची इच्छाही ठाकूर यांनी व्यक्त केली. सतीश गोरे म्हणाले, परांजपे यांनी चिंतन, मनन, लेखनही विपुल प्रमाणात केले. त्यांच्या पुस्तकांना अभिजात दर्जा आहे. चित्रकलेबरोबरच त्यांचे वैचारिक योगदानही महत्त्वाचे आहे. विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. १६ ते २४ जुलै दरम्यान परांजपे यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन रवी परांजपे स्टुडिओ येथे भरवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Preservation classical art tribute ravi paranjape students friends pune print news amy

Next Story
पुण्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांची शिवसैनिकांनी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी