साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण छापील स्वरूपात माध्यमांपर्यंत वेळेत पोहोचण्याची शक्यता दुरावल्याचे स्पष्ट झाले आहे. सबनीस यांचे भाषण शनिवारी (१६ मार्च) सकाळी दहा वाजता उद्घाटनाच्या कार्यक्रमात होणार आहे. सबनीस यांनी त्यांचे भाषण गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास साहित्य महामंडळाकडे दिले. कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी ते ताब्यात घेतले.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी शुक्रवारी दिवसभर संमेलनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने १३४ पानांच्या या भाषणाचे वाचन करून नंतर छपाई करण्यासाठी आता पुरेसा वेळच उरलेला नाही, त्यामुळे हे भाषण छापायचे किंवा नाही, याचा निर्णय करण्यासाठी महामंडळाची बैठक शुक्रवारी रात्री झाली. या बैठकीत भाषण छपाईला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या भाषणामध्ये काही नकाशांचाही समावेश असून त्यासह तातडीने मुद्रण करून देणारे मुद्रणालय संयोजकांना मिळवावे लागले. त्यानंतर भाषण छपाईसाठी देण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाला काही तास बाकी असताना हे भाषण छपाईला गेल्यामुळे या भाषणाची मुद्रित प्रत शनिवारी संमेलनाला आलेल्या साहित्यरसिकांच्या हातात पडेल का नाही याची माहिती कोणालाही नव्हती.