राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल अशी भूमिका घेणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहणार की भाजप सरकारला पाठिंबा देणार, असे विचारले असता यासंदर्भातील निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटले हे खरे आहे. त्यांनी काही प्रस्ताव दिला असला, तरी आम्हाला त्यामध्ये रस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 कोणत्याही पक्षाला जनादेश मिळालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सरकार करू शकत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना एकत्र आले, तर सुंठेवाचून खोकला गेला आणि आम्ही मोकळे झालो. सध्या तरी हे दोन पक्ष एकत्र येतील अशी चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्रिपदासाठी नावे सुचविण्याचा प्रस्ताव शिवसेनेने स्वीकारलेला दिसतो. मात्र, त्यांची युती झाली नाही, तरी राज्यामध्ये पुन्हा निवडणुका होऊ नयेत असे वाटते. राज्यात अस्थिरता निर्माण होईल अशी भूमिका आमचा पक्ष घेणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. राज्याच्या हिताचा विचार करून पाठिंबा दिला म्हणजे भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा नाही. मात्र, विरोधासाठी विरोधही करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर करण्याची घाई केली असे वाटते का यावर ‘आम्ही निर्णय घेतल्याचे परिणाम राज्यात आपण पाहातच आहोत’, असे भाष्य पवार यांनी केले. भ्रष्टाचाराच्या चौकशीपोटी पाठिंब्याचा निर्णय घेतला का याविषयी ‘काय चौकश्या करायच्या आहेत त्या करूनच टाकाव्यात एकदाच्या. त्यातून सत्य बाहेर येईल’, असे पवार म्हणाले.
निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेसने आत्मपरीक्षण करायला हवे का, या प्रश्नावर ‘त्यांनी आत्मपरीक्षण करावे का हे आम्ही कोण सांगणार’, असा प्रतिप्रश्न पवार यांनी केला. काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा या ज्येष्ठ काँग्रेसनेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ‘कोणत्याही विषयावर बाळासाहेबांना महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याची सवयच आहे’, असे भाष्य पवार यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताना महाराष्ट्राच्या हिताचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दा उपस्थित करून ते अभिवचनापासून ढळणार असतील, तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असे पवार यांनी सांगितले. ‘एमआयएम’ पक्षनेत्यांची भाषणे देशाच्या एकतेला समस्या निर्माण करण्याची शक्यता वाटण्याजोगी आहेत. दोन समाजात संघर्ष वाढेल, अशी भूमिका घेणे योग्य नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
‘सीईओ’ला कायदेशीर चौकट कोणती
मुंबईसाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नियुक्त करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे पेच झाला आहे. या संदर्भात शरद पवार म्हणाले, ‘सीईओ’पदी व्यक्ती नेमली, तर तिला कायदेशीर चौकट काय आहे. एक तर त्यासाठी विधिमंडळात कायदा तरी झाला पाहिजे. किंवा मंत्रिमंडळाने तरी निर्णय घ्यायला हवा. या संदर्भात स्वच्छ स्वरूप पुढे आलेले नसल्यामुळे त्या विषयी भाष्य करणे योग्य होणार नाही. या विषयी १०-१२ वर्षांपूर्वी प्रस्ताव आला होता. मात्र, त्या वेळी तो बारगळला, असेही त्यांनी सांगितले.