scorecardresearch

पोह्यंच्या दरात वाढ ; दिवाळीत चिवडाही महाग

कच्च्या मालाच्या तुटवडय़ामुळे दरवाढ झाली असून दिवाळीपर्यंत दर तेजीत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पोह्यंच्या दरात वाढ ; दिवाळीत चिवडाही महाग
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : सामान्यांचा नाश्ता महाग झाला असून गेल्या तीन महिन्यांपासून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुऱ्यामुऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवडय़ामुळे दरवाढ झाली असून दिवाळीपर्यंत दर तेजीत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

धानाचे (साळ) दर वाढले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून पोहे, मुरमुऱ्याची आवक होती. मुरमुरे आणि भाजक्या पोह्यांवर यापूर्वी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यात येत नव्हता. आता २५ किलोपर्यंतच्या पिशवीतील पोहे, मुरमुऱ्यांवर जीएसटी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोहे, मुरमुऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. अन्नधान्यावर जीएसटी आकारणी करण्यात आल्यानंतर पाच ते सात टक्क्यांनी दर वाढले आहेत, असे मार्केट यार्डातील व्यापारी सुमित गुंदेचा यांनी सांगितले.

बाजारात कच्च्या मालाचा (धान, साळ), तुटवडा जाणवत आहे. पोह्यांचे उत्पादन गुजरात आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठय़ा प्रमाणावर केले जाते. कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याने तेथील उत्पादक तसेच प्रक्रिया उद्योजकांनी (मिल) दरात वाढ केली आहे. जोपर्यंत कच्चा माल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पोह्यांचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

वर्षभर पोह्यांना मागणी

पातळ पोहे, दगडी पोहे चिवडा तयार करण्यासाठी वापरले जातात. साध्या पोह्यांचा वापर नाश्त्यासाठी केला जातो. वर्षभर पोह्यांना मागणी असते. उपाहारगृहचालक, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच घरगुती ग्राहकांकडून वर्षभर पोह्यांना मागणी असते. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह कोकणातील रोहा आणि पेण येथून पोह्यांची आवक होते. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दहा ट्रक पोह्यांची आवक होते.

धान आणि तांदळाचे दर वाढत चालले आहेत. यापूर्वी पोह्यांच्या दरात एवढी वाढ झाली नव्हती. धानापासून मुरमुरे, भाजके पोहे, भडंग तयार केले जातात. पिशवीतील पोहे आणि मुरमुऱ्यांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. दिवाळीपर्यंत पोहे, भाजके पोहे, मुरमुऱ्यांचे दर तेजीत राहणार आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीत चिवडाही महाग होणार आहे.

सुमित गुंदेचा, पोहे व्यापारी, मार्केट यार्ड

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.