पुणे : आषाढी एकादशीच्या उपवासासाठी साबुदाणा, भगर, शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. यंदा उत्पादन चांगले असल्याने राज्यासह परराज्यांतून मोठ्या प्रमाणात शेंगदाणा, साबुदाण्याची आवक मार्केट यार्डातील भुसार बाजारात झाली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत साबुदाणा, शेंगदाणा, भगरीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साबुदाणा, भगर, शेंगदाण्याची आवक वाढली आहे. तमिळनाडूतील सेलम जिल्ह्यात साबुदाण्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सेलम जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर साबुदाणा विक्रीस पाठविण्यात आला आहे. आठवडाभरापासून मार्केट यार्डात दररोज १०० ते १२५ टन साबुदाण्याची आवक होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साबुदाण्याची आवक वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातून दररोज ५० टन भगरीची आवक होत आहे. यंदा मागणीच्या तुलनेत उत्पादन जास्त झाले आहे. उपवासाच्या पदार्थांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती साबुदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशातून शेंगदाण्याची आवक होत असून, बाजारात दररोज १०० टन शेंगदाण्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात एक किलो शेंगदाण्याला प्रतवारीनुसार ९२ ते ११५ रुपये दर मिळाले आहेत. उपवासासाठी शेंगदाणा, भगर, साबुदाण्याला मागणी वाढली असल्याचे व्यापारी आशिष दुगड यांनी सांगितले.
गावरान रताळी लागवडीवर परिणाम
यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने सोलापूर, कराड, मलकापूर भागातील रताळी लागवडीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रताळ्यांची आवक कमी झाली आहे. मात्र, बेळगाव परिसरातून रताळ्यांची आवक वाढली आहे. रताळ्यांचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात एक किलो गावरान रताळ्यांना ५० ते ६० रुपये दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये किलो दराने रताळ्यांची विक्री केली जात आहे. कर्नाटकातील रताळी आकाराने मोठी असतात, तसेच चवीला तुरट असतात. कर्नाटकातील रताळ्यांना घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात कर्नाटकातील रताळ्यांची विक्री ५० ते ६० रुपये किलो दराने केली जात आहे. गेल्या वर्षी गावरान रताळ्यांची पाच हजार गोणी आवक झाली होती. यंदा गावरान रताळ्यांची २५०० ते २७०० गोणी आवक झाली आहे. कर्नाटकातील रताळ्यांची चार गोणी आवक झाली असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील अडते अमोल घुले यांनी दिली.
घाऊक बाजारातील किलोचे दर
साबुदाणा : ४३ ते ५४ रुपये किलो
भगर : १०० ते ११० रुपये किलो
शेंगदाणा : ९२ ते ११५ रुपये किलो