scorecardresearch

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शुभेच्छा संदेशाच पत्र देखील ट्रस्टला मिळालं आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक, म्हणाले…
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑगमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे गणेशभक्तांना घरबसल्या आरतीचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाच पत्र ट्रस्टला पाठवले आहे.

“श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टद्वारे साजरा केला जात असलेल्या १२९ व्या गणेशोत्सवाबद्दल जाणून आनंद वाटला. करोना महामारी पाहता भाविकांना व्हर्च्युअल माध्यमाने श्री गणेश दर्शन आणि आरतीचे आयोजन प्रशंसनीय आहे. लोकामान्य बाळ गंगाधर टिळकांनी आस्थेला समाज आणि संस्कृतीसोबत जोडून, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लोकांमध्ये एकजुटीची भावना बळकट केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टद्वारे आयोजित गणेशोत्सव त्याच समृद्ध परंपरेला बळकटी देतो आहे. अशा प्रकारच्या आयोजनासाठी ट्रस्टला हार्दिक शुभेच्छा.” असं पंतप्रधान मोदींनी पत्रात म्हटलेलं आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव यंदाच्या वर्षी देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले होते.त्या आवाहनाला गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद देण्यात आला असून, साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, याची दक्षता मंडळीनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सर्व कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या तंत्रज्ञानाचा भाविकांनी चांगलाच लाभ घेतला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य मंदिरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

आता या तंत्रज्ञानाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेशाच पत्र ट्रस्टला पाठवले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2021 at 21:39 IST

संबंधित बातम्या