पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. येरवडा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव मेघराज महापूर (वय ४३) असे खून करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. तसेच आरोपी दिनेश दबडे (वय ३५) हा हत्येच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हे दोघे कैदी किचनमध्ये काम करत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याच दरम्यान आरोपी दिनेश दबड़े याने सुखदेव महापूर याच्या पाठीमागून येऊन डोक्यात दगड घातला. यात सुखदेव जागीच मृत पावला.

खून झालेल्या सुखदेव महापूर याला अपहरणाच्या गुन्ह्यात साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मागील सात महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचबरोबर आरोपी आणि खून झालेले कैदी दोघेही एकाच बराकीमध्ये राहत होते. या घटनेमागील आधिक तपास सुरू असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे.

यापूर्वी येरवडा कारागृहात कातिल सिद्दीक याचा मोहोळ टोळीतील गुन्हेगारांनी खून केला होता. आजच्या खूनच्या प्रकारामुळे पुन्हा कारागृहातील कैदी आणि प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे.