“ममता बॅनर्जींनी स्वतः मोदींसोबत सहकारी म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा कधी त्या रंग बदलतील, पुन्हा मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही. आज काँग्रेसच एक असा पक्ष आहे, जो सतत आणि सलग या जातीयवादी पक्षांच्या विरोधात उभा राहिलेला आहे.” असं विधान काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात केलं.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता, यूपीए अस्तित्वात नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांना देखील लक्ष्य केल्याचं दिसून आलं होतं. एखाद्याने काहीच करायचं नाही आणि केवळ परदेशात राहायचं, अशाने काम कसं चालेल? असा सवाल त्यांनी केला होता. शिवाय, “सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र असतील तर भाजपला पराभूत करणे सोपे जाईल. राज्यात परिस्थिती चांगली असली तरी मला बंगालमधून बाहेर पडावे लागले जेणेकरून इतरही बाहेर पडतील आणि त्यांना स्पर्धा करता येईल,” असंही ममता बॅनर्जी आपल्या मुंबई दौऱ्यात म्हणाल्या होत्या.

यावर प्रत्युतर देताना आज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “ममता बॅनर्जी देशाच्या नेत्या आहेत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना त्यांचे विचार आहेत, त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. त्यांना विचार मांडायचं स्वातंत्र्य आहे. काँग्रेसने त्यांचे विचार स्वीकारावेत असा काही प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे एक स्पष्ट गोष्ट आहे की आज मोदींना सत्तेतून बाहेर करायचं असेल, तर सर्व विरोधी पक्षांनी एकजुट केली पाहिजे, निवडणुकीपूर्वी एक आघाडी केली पाहिजे आणि तशाप्रकारची विरोधी पक्षांची आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही. कारण, इतर सर्व पक्ष एका-एका राज्यापुरते मर्यादित आहेत. आज काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की ज्याचं अस्तित्व संबंध देशभरात कमीजास्त प्रमाणात आहे. त्यामुळे जर कुणी काँग्रेसशिवाय मोदींना विरोध करायचा किंवा त्यांच्याविरोधात आघाडी करायचा प्रयत्न करत असेल, तर मोदींना अप्रत्यक्षपणे त्या मदत करत आहेत.”

“काँग्रेस बंगालमध्ये लढू शकते, तर तृणमूल..”; ममता बॅनर्जींचा काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न?

तसेच, “ममता बॅनर्जी या पूर्वी मोदींच्या सहकारी होत्या, त्यांनी भाजपाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा भाजपाला सहकार्य करण्यात त्यांना काही अडचण वाटण्याचा प्रश्न नाही. मला एवढच सांगायाचं आहे की त्यांना जर नेता व्हायचं असेल तर त्यांनी जरूर व्हावं. त्यांच्या राजकीय महत्वकांक्षा असतील तर त्यात काही गैर नाही. परंतु आज मोदींच्या विरोधात होत असलेली जी सर्वपक्षीय एकजुट आहे, ती त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यामुळे केवळ मोदींचा फायदा होईल.” असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवलं.