राज्यात दोन हजार खासगी बसच्या माध्यमातून वाहतूक

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी खासगी वाहतूकदारांना एसटी स्थानकातून प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली असताना काही ठिकाणी खासगी बसवर दगडफेक, चालकाला मारहाण आदी घटना घडल्यानंतर गुरुवारी सकाळपासून एसटी स्थानकाच्या आवारातून वाहतूकदारांनी बस सोडणे बंद केले होते. मात्र, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू केल्याची माहिती राज्य प्रवासी, माल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. राज्यभरात सुमारे दोन हजार खासगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून बंद तीव्र केला असून, गुरुवारी चौथ्या दिवशीही राज्यातील एसटीची वाहतूक ठप्प होती. प्रवाशांची गैरसोय लक्षात घे्ता ९ नोव्हेंबरपासून खासगी वाहतूकदारांना एसटीच्या स्थानकातून प्रवासी वाहतुकीस राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्या माध्यमातून वाहतूक सुरळीत होत असतानाच बुधवारी काही भागांत बसवर दगडफेक आणि चालकास मारहाणीच्या घटना घडल्या.

एसटीचे अधिकारी, स्थानिक पोलीस सहकार्य करीत नसल्याने सुरक्षा मिळेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून एसटी स्थानकातून खासगी वाहतूक बंद करण्यात आली होती.

वाहतूकदारांनी गुरुवारी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. खासगी बसला सुरक्षा देण्याची हमी परब यांनी दिली. त्याबाबत पोलीस प्रशासन, एसटीचे अधिकारी, आरटीओ यांना सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजभरातील वाहतूकदारांनी गुरुवारी दुपारपासून पुन्हा एसटीच्या स्थानकातून प्रवाशांची वाहतूक सुरू केली.

पुणे विभागात सर्वाधिक निलंबन

एसटी प्रशासनाकडून सध्या बंदमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. ११ नोव्हेंबपर्यंत एसटीच्या २९ विभागातील एकूण ११३५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक १३८ कर्मचारी पुणे विभागातील आहेत. त्यापाठोपाठ जळगाव विभागात ९१, ठाणे ७३, बीड ६७, अकोला ६६, मुंबई ६४, रायगड ६३, पालघर ५७, यवतमाळ ५६, नाशिक ५४, धुळे विभागात ५४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने खासगी बसच्या वाहतुकीसाठी सुरक्षेची हमी दिल्यानंतर गुरुवारी दुपारपासून पुन्हा स्थानकातून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांबाबत आम्हाला सहानुभूती आहे. पण, प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आम्ही मदत करीत आहोत.

बाबा शिंदे,  अध्यक्ष, राज्य माल, प्रवासी वाहतूक संघटना.