पुण्यात एसटीसोबत आता खासगी बसेसही बंद; सरकार सहकार्य करत नसल्याने बस संघटनेचा निर्णय

परिवहन मंत्री जोपर्यंत ग्वाही देत नाहीत, तोपर्यंत आम्ही बस सोडणार नाही, असं पुणे बस असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाच्या बसेस बंद आहेत. त्यासोबतच आता पुण्यात खासगी बसेसही बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने पुणे बस असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही. काल कोल्हापुरात खासगी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. तसंच ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली. पुण्याहून भरुन गेलेल्या बस रिकाम्या परत आल्या. या कारणांमुळे बस संघटनेने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

आज दुपारी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करु आणि जर अशा पद्धतीने खासगी बसेसचं नुकसान होणार असेल, तर आम्ही बसेस थांबवू असं बस संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी जाहीर केलं आहे. तसंच संपाला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, “आमच्या २००० बसेस काल आम्ही सोडल्या. त्यातल्या ८० टक्के बसेस या स्थानिक प्रशासनाने मदत न केल्यामुळे रिकाम्या परत आल्या. त्यातही ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली, बसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे आम्ही बस संघटनेने असा निर्णय घेतला आहे की परिवहन मंत्री जोपर्यंत ग्वाही देत नाहीत, तोपर्यंत आम्ही बस सोडणार नाही. परंतु लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या राज्यातल्या ज्या इतर बसेस आहेत, त्या मात्र सुरू राहतील”.

हेही वाचा – प्रवाशांना वेठीस धरू नका!; संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. मात्र एसटी महामंडळाच्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार यांना नोटीस देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Private buses stopped in pune because no support from government vsk

ताज्या बातम्या