scorecardresearch

राज्यात खासगी कारखाने वाढले, शेतकऱ्यांना फायदा नाहीच

राज्यातील सहकार क्षेत्राची भुरळ केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पडली आहे.

दत्ता जाधव

पुणे : राज्यातील सहकार क्षेत्राची भुरळ केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पडली आहे. उत्तरेकडील राज्यांत सहकाराचा विस्तार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. सहकाराला चालना देण्यासाठी देशातील पहिले सहकार विद्यापीठ पुण्यात स्थापन करण्याचाही निर्णय झाला आहे. मात्र, राज्यातील सहकारी साखर कारखानादारीला खासगी क्षेत्राचे ग्रहण लागले आहे.  यंदाच्या हंगामात सहकारी ९८ तर खासगी ९९ कारखाने सुरू आहेत. भाडेतत्त्वावर दिलेल्या १४ कारखान्यांचा समावेश केल्यास खासगी कारखान्यांची संख्या ११३ वर जात आहे.  राज्यातील सहकारी क्षेत्राचे देशभरात मोठे नाव आहे. मात्र सहकारी संस्था व्यावसायिकपणे  चालविल्या जात नसल्याचा परिणाम म्हणून अनेक कारखाने तोटय़ात जात आहेत. ते कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले जात आहेत. शिवाय पूर्णपणे खासगी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या कारखान्यांची संख्याही मागील पाच वर्षांत वेगाने वाढली आहे.

खासगी कारखान्यांच्या वाढीचा आलेख

सन २००८-९ मध्ये राज्यातील खासगी कारखान्यांची संख्या फक्त २८ होती. २०१४-१५ मध्ये ती ७९ झाली. २०२०-२१ मध्ये ती वाढून ९५ झाली आहे. यंदाच्या गाळप हंगामात ती ९९ वर गेली आहे. त्यात भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेल्या कारखान्यांचा समावेश केल्यास खासगी कारखान्यांची संख्या ११३वर जाते. भाडेतत्त्वावर दिलेले कारखान्यांचे संचालक मंडळ कायम असल्याने त्यांची नोंद सहकारी क्षेत्रात होते. मात्र, अशा कारखान्यांवर सभासद शेतकरी, संचालकांचे कोणतेही नियंत्रण असत नाही. अनेक राजकीय नेत्यांचे सहकारी आणि खासगी स्वरुपाचे कारखाने आहेत.

खासगी कारखाने सहकाराला मारक

राज्यात खासगी कारखाने वाढल्याचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. एफआरपीची रक्कम देतानाही त्यांचा हात आखडताच आहे. इथेनॉल निर्मिती वाढल्यानंतर होणाऱ्या अधिकच्या फायद्याचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. उसाचा तुटवडा निर्माण होऊन सहकारीच्या तुलनेत खासगी क्षेत्राने अधिक दर दिल्याचे अद्याप तरी समोर आलेले नाही. चालू गळीत हंगामावर दृष्टिक्षेप  यंदाच्या गाळप हंगामात एक मार्चअखेर ९८ सहकारी कारखान्यांनी ५ कोटी ५ लाख ६१ हजार ४७० टन ऊस गाळप करून १०. ६४ टक्के उतारा मिळवत ५ कोटी ३७ लाख ७५ हजार २४५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. ९९ खासगी कारखान्यांनी ४ कोटी ४६ लाख ९७ हजार ५९१ टन ऊस गाळप करून ९.८८ टक्के उतारा मिळवित ४ कोटी ४१ लाख ७७ हजार ९८८ क्विटल साखर उत्पादन केले आहे. यंदाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. ऊस शिल्लक असणाऱ्या भागात मार्चअखेर कारखाने सुरू राहतील.

राज्यात खासगी कारखाने वाढत असले तरी आजघडीला सहकारी कारखान्यांची गाळप क्षमता जास्त आहे. त्यामुळे साखर उत्पादन आणि उताऱ्यात सहकारी कारखाने आघाडीवर आहेत. तोटय़ातील कारखाने फायद्यात आणण्यावर आमचा भर आहे. सहकार क्षेत्र सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे. अनेक सहकारी कारखान्यांकडून अभियांत्रिकी महाविद्यालये चालविली जात आहेत, त्याचा फायदाही शेतकऱ्यांच्या मुलांना होत असतो.

– शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी व्यावसायिकपणे कारखाने चालविले नाहीत. अनेक कारखान्यांत आर्थिक अनियमितता आहे. त्याचा परिणाम म्हणून कारखाने तोटय़ात जाऊन विकले जात आहेत किंवा भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले जात आहेत. खासगी कारखाने वाढणे सहकार क्षेत्राच्या हिताचे नाही. 

– बी. बी. ठोंबरे, वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन, पुणे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Private factories sprang benefiting farmers ysh

ताज्या बातम्या