सुरक्षारक्षकांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न

प्रवाशांना जलद बससेवा देण्याच्या उद्देशाने विश्रांतवाडी ते संगमवाडी टप्प्यात बीआरटीचा मार्ग सुरू करण्यात आला असला, तरी तो विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. खासगी वाहनांना या मार्गावर प्रवेश बंद असतानाही सर्रास वाहने या मार्गात घुसविली जातात. त्यांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्यांना दमदाटी करून, तर काही वेळेला सुरक्षारक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या मार्गावर सातत्याने होणाऱ्या वादाला सुरक्षारक्षकांना सामोरे जावे लागत आहे.

बीआरटीच्या मार्गात खासगी वाहने जात असल्याने या मार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे नियम मोडून जाणाऱ्या खासगी दुचाकी, चारचाकी वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी पीएमपीएलच्या वतीने सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु, सुरक्षारक्षकांना काही मंडळी जुमानतच नाहीत. सुरक्षारक्षक उभा असतानाही बीआरटी मार्गात वाहने घातली जातात. त्यावर तोडगा म्हणून विश्रांतवाडी ते संगमवाडी, डेक्कन कॉलेज ते शादलबाबा चौक या बीआरटी मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ दोरी बांधण्यात आली आहे. दोरी चटकण लक्षात यावी, यासाठी तिला लाल रंगाचे कापड बांधण्यात आले आहे. बस आल्यानंतरच ही दोरी खाली घेण्याचे आदेश सुरक्षारक्षकांना देण्यात आले. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही.

याविषयी सुरक्षा रक्षकांशी संवाद साधला असता, काही मंडळींकडून शिवीगाळ आणि धमकीचे तसेच प्रसंगी अंगावर गाडी घालण्याचे अनेक प्रकारही घडले आहेत. दोरी बांधून देखील या समस्येवर तोडगा निघालेला नाही. मार्गावर आडवी लावलेली दोरी काढण्यासाठी सुरक्षारक्षकांवर दबाव आणला जातो. त्यामुळे नाइलाजास्तव दोरी काढण्याशिवाय सुरक्षारक्षकांकडे दुसरा पर्याय राहत नाही. घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहनचालकांशी वाद न घालता नियम मोडून बीआरटी मार्गातून जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक घेऊन ते क्रमांक वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाला कळवण्याचा मार्ग अवलंबला जातो. वाहतूक शाखेकडून संबंधित वाहनांवर कारवाई होते की नाही, हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे येथे घुसखोरी सुरूच आहे.

काम पूर्णवेळ, पण सुविधा एकही नाही

बीआरटी मार्गावर उभे असणारे सुरक्षारक्षक पूर्णवेळ कामावर असतात. मात्र, त्यांच्या सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यांच्यासाठी एखादी विश्रांतीची जागा किंवा स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय आणि सातत्याच्या वादामुळे चिडचिडही होते.