दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : आपल्या वेगळय़ा चवीसाठी प्रसिद्ध असलेली टपोरी, काळीभोर बदलापूरची जांभळे अखेरची घटका मोजत आहेत. गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे, गृहसंकुलांमुळे जांभळांच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. आकारामुळे बाजारात ‘काळा राघू’ हे टोपणनाव असलेल्या या जांभळाच्या एकूण उत्पादनात सुमारे ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान

बदलापूर परिसरातील सोनिवली, एरंजाड, काराव, डोणे, बोराडपाडा, मुळगाव, बारवी धरण या परिसरात जांभळाच्या झाडांची संख्या मोठी होती. कातकरी, ठाकर या आदिवासींकडून जांभळे वेचून मुंबई, ठाणे शहरात विक्रीला आणली जायची. हलवी (हलवा) आणि गरवी (गरवा) या येथील दोन स्थानिक जाती प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपासून वाढत्या शहरीकरणाचा फटका जांभळांना बसतो आहे. गृहसंकुलांची संख्या जशी वाढते आहे, तशी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे बदलापुरातील ही जांभळे आणि जांभाळांची बाजारपेठ आता अखेरची घटका मोजू लागली आहे.    मूळ बदलापूरच्या जांभळाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असल्याचे ठाणे कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

बदलापूर परिसरातील सुमारे सोळा गावांत जांभळाची झाडे आहेत. झाडांची संख्या वेगाने कमी होत आहे. बहुतेक झाडे वन जमिनीत आहेत. जीआय मानांकन मिळाल्यानंतर झाडांच्या लागवडीला गती येईल. स्थानिक पातळीवरील रोपवाटिका चालकांना बिया जमा करून रोपे तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत.

विठ्ठल वेताळ, तालुका कृषी अधिकारी, उल्हासनगर

विविध कारणांमुळे बदलापूर जांभळांच्या उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. भौगोलिक चिन्हांकन (जीआय) मानांकन मिळाले, तर जांभळांच्या संवर्धनाला मोठा हातभार लागेल. मानांकनाची प्रक्रिया सुरू असून, लवकरच मानांकन मिळेल.

अ‍ॅड. गणेश हिंगमिरे, जीआय तज्ज्ञ

इतर जांभळांची विक्री..

मुंबई, ठाण्यातील बाजारातून आता काळा राघू म्हणून ओळख असलेली अस्सल बदलापूरची जांभळे गायब झाली आहेत. बदलापूर जांभळांच्या नावाखाली वसई, पालघर आणि गुजरातसह अन्य ठिकाणांहून आलेल्या जांभळांची सरार्स विक्री होत आहे.

फक्त तेराशे झाडे शिल्लक..

बदलापूर परिसरातील वीस गावांत सुमारे तेराशे झाडे आहेत. त्यांचे संवर्धन केले जात आहे. नव्या लागवडीसाठी ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाकडून आर्थिक मदतीसह अन्य सहकार्य मिळत आहे. मात्र हे सुकर झाले नाही, तर नजीकच्या काळात ही जांभळे दिसणे अवघड होऊ शकते.

संवर्धनासाठी प्रयत्न..

बदलापूरच्या जांभळांच्या संवर्धनासाठी जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट प्रयत्नशील आहे. या संस्थेचे प्रमुख आदित्य गोळे म्हणाले, ‘‘जीआय मानांकनाच्या प्रक्रियेतही संस्था सक्रिय आहे. वन विभागाने आपल्या जागेत जांभळाच्या नव्या रोपांची लागवड करण्यासंदर्भात परवानगी दिली आहे. संवर्धनाच्या कामात स्थानिक आदिवासींना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. ’’ या जांभूळ संवर्धनाला प्रक्रिया उद्योगांची गरज आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात जांभळे उपलब्ध होत नसल्यामुळे प्रक्रिया उद्योगही सुरू करणे कठीण असल्याचे ठाणे जिल्हा पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा समन्वयक दशरथ घोलप यांनी सांगितले.