करोनाच्या लढ्यात प्रत्येकजण आपापल्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. मावळ तालुक्यातील काही तरुणांनी एकत्रित संशोधन करून मास्क बनविण्याच्या मशीनची व डिस्पोजेबल मास्कची निर्मिती केली आहे. त्यांच्या या अविष्काराने स्वस्तात चांगल्या दर्जाचे मास्क उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे ते ससून सर्वोपचार रुग्णालय आणि नायडू सांसर्गिक रुग्णालयाला या ५० हजार मास्कचा पुरवठा करणार आहेत.

मावळातील बेबेडोहोळ येथील सोलेस हुजियानिओ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विशाल सांगडे, धीरज डेरे, दिनकर भिलारे, आशिष पायगुडे, नितीश सांगडे आणि पियूष मेंडेकर यांनी स्वतः संशोधन करून हे मास्क बनवले आहेत. या तिघेही मेकॅनिकल इंजिनजर आहेत. विशाल सांगडे यांनी अमेरीकीतून एमएस ही पदवी पूर्ण केली आहे तसेच ते पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

या उपक्रमाबद्दल सांगताना सांगडे म्हणाले, “आम्ही सॅनिटरी नॅपकिन बनविण्याच्या उद्योगात आहोत व ‘विनहर’ नावाच्या ब्रँडने आम्ही माफक दरात बाजारात नॅपकिन पुरवत आहोत. दरम्यान, करोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा मास्कचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे आपण मास्कही निर्माण करू शकू असा विचार आमच्या मनात आला. लॉकडाउन असल्याने उत्पादन करणे आव्हानात्मक होते. शिवाय त्यासाठी लागणारी मशिनरी नव्हती. तेव्हा आमच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा उपयोग करून आम्ही स्वतः मशीन तयार करुन त्यावर उत्पादनही सुरू केलं. या कामात कर्मचारी आणि इतर साहित्याची गरज होती. त्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, तहसीलदार मधुसूदन बर्गे, रोटरी तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष मनोज ढमाले आणि श्रीदया फाउंडेशनचे राज देशमुख यांचे सहकार्य मोलाचे ठरले”

तीन स्तराच्या मास्कपासून ९५ टक्के सुरक्षा

ससून सर्वोपचार रुग्णालय आणि नायडू सांसर्गिक रुग्णालय यांना प्रत्येकी २५,००० मास्क मोफत देण्याचा सोलेस कंपनीचा मानस आहे. मास्क तीन लेअरचे असून, ९५ टक्के सुरक्षा देणारे आहेत. बॅक्टेरिया फिल्टर उच्च दर्जाचा आहे. या मशीनची उत्पादन क्षमता दिवसाला एक लाख मास्क बनविण्याची आहे. आपल्या देशासाठी काम करण्याची हीच वेळ आहे व विविध संस्थांच्या माध्यमातून गरजूंना हे मास्क माफक दरात दिले जाणार आहेत. लवकरच याच्या पेटंटचीही नोंदणी केली जाणार आहे, असे विशाल सांगडे यांनी सांगितले.